रोनाल्डोचा ‘हा’ गोल पाहाल तर थक्क व्हाल

40

सामना ऑनलाईन । तूरीन

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू किताब आपल्या नावे केलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं आज पुन्हा एकदा सर्वांना थक्क केलं आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये रियल माद्रिद आणि ज्युवेंटस यांच्यामध्ये झालेल्या लढतीत रोनाल्डोने एक असा गोल मारला ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोचा हा गोल फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक गोलपैकी एक असल्याचं बोललं जात आहे. ‘बायसिकल किक’ मारत रोनाल्डोने हा गोल केला असून रोनाल्डोमुळेच माद्रिदला ज्युवेंटसचा ३-० ने पराभव करत विजय मिळवणे शक्य झाले.

सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या मिनिटालाच रोनाल्डोनं गोल करत माद्रिदला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सामना संपण्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये रोनाल्डोनं आपल्या संघासाठी दुसरा गोल केला. त्याचे चॅम्पियन्स लीगच्या चालू सत्रात एकूण १४ गोल झाले असून २०१८मध्ये खेळण्यात आलेल्या सर्व सामन्यांत रोनाल्डोने एकूण २३ गोल केले आहेत. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये लागोपाठ १० सामन्यांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

माद्रिदचे मुख्य प्रशिक्षक जिनेदिन जिदान यांनी रोनाल्डोच्या या गोलला फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान गोल अंस संबोधलं आहे. सोशल मीडियावरही या अनोख्या गोलमुळे रोनाल्डोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माद्रिदचा माजी खेळाडू अल्वारो अर्बेलोआ यानंही ट्विट करत रोनाल्डोचं कौतुक केले आहे. त्यानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आता ख्रिस्तियानो रोनाल्डो मंगळावरच्या लोकांशी जाऊन फुटबॉल खेळू शकतो. इथं तर त्यानं सारंच मिळवलं आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या