गोलपोस्टच्या पलीकडचे; कुछ तो गडबड है, दया!

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू रोनाल्डोचे जगात कोटय़वधी चाहते आहेत. मँचेस्टर युनायटेड क्लबने आपण सहमतीनेच रोनाल्डोला क्लब सोडण्याची अनुमती देत आहोत असे ट्विट केले आहे, पण स्टार रोनाल्डोला गळय़ातले ताईत मानणारे जगभरातील चाहते मात्र मँचेस्टर युनायटेड क्लबनेच अंतर्गत कलहामुळे रोनाल्डोला बाहेरचा मार्ग दाखवल्याचे सांगत आहेत. ज्या खेळाडूने क्लबला आपल्या खेळाने आगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले त्यालाच असे अपमानित करून बाहेर काढणे हा निव्वळ कृतघ्नपणाच आहे, असे या चाहत्यांचे म्हणणे आहे. कतारला रवाना होण्यापूर्वी एका टीव्ही मुलाखतीत रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड क्लब आणि मुख्य प्रशिक्षक एरिक टेन हँग यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्याचाच परिणाम क्लबने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात झालाय असे इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू वेन रूनी याचे म्हणणे आहे. त्यामुळे क्लब आणि रोनाल्डो यांच्या या कृतीबाबत ‘कुछ तो गडबड है, दया!’ हे ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे लोकप्रिय वाक्य रोनाल्डोचे चाहते बोलताना दिसत आहेत.