पीक विम्याची तुटपुंजी रक्कम खात्यावर ; शेतकऱ्यांमधून तीव्र संताप

108

सामना प्रतिनिधी । गंगाखेड

गंगाखेड तालुक्यात गेल्या खरीप हंगामात सन २०१७-१८ मध्ये खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद या पीकांचा विमा शेतकऱ्यांनी भरला होता. गेल्या दोन महिन्यांखाली महातपुरी मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्याच्या खात्यावर आली होती. तालुक्यातील गंगाखेड, माखणी व राणी सावरगाव या तीन मंडळास वगळण्यात आले होते. पीकविमा मिळावा म्हणून विविध पक्षांनी धरणे, आंदोलन व उपोषणे केली होती. विमा कंपनीकडून शुक्रवारी दुपारी १२ पासून गंगाखेड, माखणी व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ ते ७ हजार रुपये रक्कम जमा होत आहे. ही तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या खरीप हंगामामध्ये तालुक्यात एकंदरीत पर्जन्यवृष्टी अतिशय अत्यल्प झाली. निसर्गाचा रागरंग पाहून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद व कापूस या पिकांचा लाखो रूपयांचा विमा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व ऑनलाईन भरला होता. प्रशासनाने तालुक्यातील ४१ टक्के पीक पैसेवारीचा अहवाल पाठविला होता. गेल्या मार्चमध्ये महातपुरी मंडळ अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर प्रती हेक्टरी २० हजार ८०० रूपये पीक विम्याची रक्कम आली होती. एकाच मंडळात विमा शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी संभ्रमात पडले. गंगाखेड, माखणी व राणीसावरगाव मंडळांतर्गत विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतापले. शेतकऱ्यांची बाजू घेत विविध पक्ष व संघटनांनी आंदोलने केली होती.

त्यानंतर शुक्रवारी माखणी मंडळांतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर ५ हजार रूपये, ७ हजार रूपये जमा होण्यास सुरू झाले. ज्या शेतकऱ्याने ३३० रुपये भरले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३०८३ रुपये तर ५५० रुपये भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार ४८० रुपये जमा होणे सुरू झाले आहे. सदर रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. एका मंडळातील विमा प्रती हेक्टरी २० हजार ८०० रूपये मिळतो आहे तर दुसऱ्या मंडळातील शेतकऱ्यांना तुटपुंजी विमा रक्कम का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एस.बी.आय, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदींसह राष्ट्रीय, मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरु झाले आहे. तालुक्यात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. एकंदरीत, तुटपुंजी विमा रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

तुटपुंजा रकमेबाबत न्यायालयात जाणार- मुरकुटे
शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी जी रक्कम जमा करीत आहे ती रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलने छेडणार असून विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयात धाव घेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गंगाखेड विधानसभाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या