सूरपारंब्या

4745

संग्राम चौगुले, [email protected]

व्यायाम, खेळ हे अत्यंत नियोजनबद्ध प्रकार. पण लहानपणी खेळलेल्या मातीच्या खेळांतून खेळाडू घडत जातात.

‘श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ असं म्हटलेलंच आहे. श्रावणात सगळीकडे हिरवळ पसरलेली असतानाच मोठमोठय़ा झाडांवर, त्यांच्या पारंब्यांवर लटकत मित्रमैत्रिणींबरोबर हुंदडण्याची मजा काही औरच असते. पण यामुळे नकळत व्यायामही घडून जातो याची आपल्याला कल्पना नसते. झाडांच्या संगतीने सूर-काठी, सूर-पारंब्या असे काही खेळ खेडय़ापाडय़ांमध्ये खेळले जातात. हेच खेळ शहरांमधील जिममध्ये व्यायाम म्हणून आवर्जून केले जात आहेत. या श्रावणातही हे खेळ फिटनेससाठी अवश्य खेळले पाहिजेत.

लहानपणी काही खेळ आपण फक्त टाइमपास आणि मजा म्हणून खेळायचो. पण कळत नकळत या खेळांमुळे झालल्या व्यायामामुळे आपला फिटनेस उत्तम राहायचा. आपली फिटनेस लेव्हल वाढायची. माझे स्वतःचे करीयरही लहानपणीच्या याच खेळांमुळे सुरू झाले आहे, पण हे मला आता समजतेय. असेच काही खेळ आहेत ज्यांनी माझा फिटनेस वाढवला आणि ते नकळत झाले. या खेळांपैकी बरेच खेळ आता अनेकजण पैसे भरून शिकत आहेत. त्या खेळांपासून मिळणाऱया व्यायामाला आज खरी मागणी आहे. लहानपणी गावाकडे खेळले जाणारे सगळ्यात आवडते खेळ म्हणजे ‘सूर-काठी’ आणि ‘सूर-पारंब्या’.

सूर-काठी

या खेळाबद्दल किती लोकांना माहीती आहे याची कल्पना नाही, पण या खेळात सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे झाडे. दुसऱया त्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे झाडावर तुम्हाला चढता आले पाहिजे. ते येत असेल तरच हा खेळ शक्य आहे. हा खेळ खेळताना खेळात ५ ते ६ सदस्यांची गरज असते. या खेळात जो पळणारा असतो, म्हणजे ज्याच्यावर डाव आलेला असतो, तो झाडाच्या खाली असतो आणि बाकीचे झाडावर. झाडाच्या खाली एक छोटे वर्तुळ आखायचे. त्या वर्तुळात एक ते दीड फुटाची एक छोटी काठी ठेवायची. बाकीच्या सदस्यांपैकी एकाने ती काठी लांब फेकायची आणि सर्वांनी झाडावर चढून बसायचे. झाडामागे लपूनही बसता येईल. ज्याच्यावर डाव असतो तो ती काठी घेऊन येणार आणि त्या वर्तुळात ठेवणार. मग बाकीच्यांना पकडण्यासाठी (म्हणजे शिवण्यासाठी) तो झाडावर चढणार. पण त्याला की काठीसुद्धा वाचवायची असते. तो कुणालाही पकडेपर्यंत एखाद्याने झाडावरून उतरून जर ती वर्तुळातील काठी घेतली तर त्याने परत ती काठी दूर फेकायची. परत खेळ चालू… असा हा खूपच मजेशीर खेळ होता. यामध्ये आता फिटनेसचा वापर कसा व्हायचा ते सांगतो. एक म्हणजे ती काठी आणताना धावण्याची गरज आहे. धावणे हा खूपच चांगला व्यायाम आहे हे सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे केवळ बाहेरचेच नाही, तर शरीराच्या आतील स्नायूही बळकट होतात. दुसरे म्हणजे झाडावर चढण्यासाठी हातामध्ये आणि पायामध्ये ताकद असायला पाहिजे. बऱयाच ठिकाणी झाडाच्या फांदीवर लटकावे लागते. तेथे परत हाताचे आणि खांद्यांचे स्नायू बळकट असण्याची गरज लागते. झाडावर चढण्या-उतरण्यात हातापायांना चांगला व्यायाम होतो.

सूर-पारंब्या

‘सूर-पारंब्या’ हा खेळ आहे खरा, पण त्याला कुणी खेळ म्हणत असेल असे वाटत नाही. पण ताकद मिळविण्याचा तो एक चांगला व्यायामप्रकार आहे हे मात्र नाकारता येणार नाही. कारण मुळात या खेळात विश्लेषण करण्यासारखे काही नाही. या खेळामध्येही एखाद्या वडाच्या झाडाची गरज लागते. त्याला पारंब्या असतात. या खेळात या पारंब्यांना लटकणे आणि मोठे मोठे झोके घेणे एवढाच खेळ असतो. पण या खेळातही जो जास्त वेळ लटकेल आणि जो जास्त मोठा झोका घेईल तो विजयी व्हायचा.  या खेळात सगळ्यात महत्त्वाची असते ती आतली ताकद… ती या खेळातून मिळत असते. आता हा खेळ प्रसिद्ध झालाय पण त्याचे नाव बदलले आहे. या खेळाच्या संमिश्रणाला ‘क्रॉसफिट’ आणि ‘फिक्शनल ट्रेनिंग’ म्हणतात. आता फक्त पारंब्या रस्सीमध्ये परावर्तित झाल्या आहेत. कारण हा खेळ झाडावर लटकण्याचा राहिलेला नाही, तर जिममध्ये रस्सीवर लटकण्याचा झाला आहे. त्यासाठी मोठय़ा ग्राऊंडचीही आवश्यकता लागत नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या