श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगाचे लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. नागपंचमीनिमित्त मंदिर सभामंडपात नागाची व मंदिरात महादेवाची प्रतिकृती विविध फुलांनी उभी करण्यात आली.
दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्याने अनेकजण मुखदर्शन, कळस दर्शन घेवून परतत आहेत. रिमझीम पाऊस, गडद धुके व बोचरी थंडी यामध्ये भाविकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. मुंबई, पुणे तसेच इतर राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी दाखल झाले होते. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शांततेच्या वातावरणात “ओम नमः शिवाय ” च्या जयघोषात भाविक दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळाले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भाविकांची भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी असते. त्यात शनिवार, रविवार भाविकांनी मुक्कामी राहून पहाटे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिरामध्ये देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडिलकर, गोरक्षनाथ कौदरे, आशिष कोडिलकर, संतोष गवांदे , व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे भाविकांना चांगले दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. वाहनतळ ते बसस्थानका पर्यंत एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिक्षक गोविंद जाधव, तुकाराम पवळे, वसंत आरगडे, चंद्रकांत शितोळे, चालक प्रशिक्षक मारूती खळदकर भाविकांना एसटीच्या मोठया बस, मिनिबस मधून जा – ये करण्याचे नियोजन करत होते.