राखी बांधणाऱ्या विद्यार्थिनींनाच जवानांनी छेडले…चौकशीचे आदेश

25

सामना ऑनलाईन । छत्तीसगड

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावीत दंतेवाडा भागात भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य सीआरपीएफच्या जवानांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी या जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दंतेवाडातील मुलींच्या शाळेत ३१ जुलै रोजी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवानांना राख्या बांधायला मिळणार म्हणून विद्यार्थीनीही आनंदात होत्या. जवानांना राखी बांधल्यानंतर सर्व विद्यार्थीनी दुपारी हॉस्टेलवर परतल्या. त्यातील काही जणी प्रसाधनगृहात गेल्या असत्या अचानक काही जवान तिथे आले.

जवानांना प्रसाधनगृहात पाहून विद्यार्थीनी बावरल्या. कदाचित जवानांना माहिती नसेल असे समजून त्यांनी जवानांना हे महिला प्रसाधनगृह असल्याचे सांगितले. त्यावर आम्ही येथे सुरक्षा तपासणीसाठी आलो असल्याचे सांगत या जवानांनी विद्यार्थीनींशी अंगलट करायचा प्रयत्न केला. विद्यार्थीनींनी यास विरोध करताच तुमची तपासणी करायची आहे असे सांगून जवानांनी मुलींना कपडे काढण्यास सांगितले. यामुळे हादरलेल्या मुलींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या जवानांनी तिथून पळ काढला.

विद्यार्थीनींनी हा प्रकार वॉर्डनला सांगितला. त्यानंतर शाळा प्रशासनाने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. सामाजिक कार्यकर्ते हिंमांशु यांनी सोशल साईटवर याबद्दल पोस्ट टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या