सौदीतील हल्ल्यांनंतर जगभरात तेल संकट, 10 टक्क्यांनी दर वाढ

697
petrol-diesel

सर्वात मोठी तेल कंपनी ‘अरामको’ वर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तेल बाजारात कच्च्या तेलाची किंमत 10 टक्क्यांनी अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

सौदी अरब आणि अमेरिकेने या हल्ल्यासाठी तेहरान समर्थर हाउती बंडखोरांना जबाबदार धरले आहे. तसेच इराणला गंभीर परिणामांसाठी तयार रहा अशा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र इराणने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सौदी अरबमधील प्लांटवर झालेल्या हल्ल्यानंतर येथून निघणारे उत्पादन अर्ध्याहून अधिक घटले आहे. हाँगकाँगमध्ये तेल बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 11.77 टक्क्यांनी वाढून 67.31 अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी सौदी अरबच्या तेल विहिरींवर ड्रोन हल्ल्यांकरता इराणला जबाबदार धरले असून परिणामांना तयार रहा, असा इशारा देखील त्यांनी दिला. देशातील तेलक्षमतेचा अर्धा भाग या हल्ल्यांमुळे बाधित झाला आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, शनिवारी 10 ड्रोनमधून हे हल्ले करण्यात आले. सौदी अरबमधील हिजरा खुरॅस जिथे सुमारे 15 लाख बॅरल तेलाचे उत्पादन होते आणि दुसरे अबकॅक जिथे 70 लाख बॅरल कच्च्यातेलावर प्रक्रिया केली जाते, त्याला लक्ष्य करण्यात आले आहे.

हल्ल्यांनंतर पोम्पियो यांनी ट्वीट केले आहे, ‘सौदी अरबमध्ये जवळपास 100 हल्ल्यांमागे तेहरानचा हात आहे. राष्ट्रपती हसन रुहानी आणि परराष्ट्र मंत्री महम्मद जावद जरीफ हे कूटनीतीमध्ये सहभागी झाल्याचा दिखावा करत आहेत. तणाव कमी करण्याचे आव्हान असतानाच इराणने आता जगभरातील उर्जा पुरवठ्यावर मोठा हल्ला केला आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या