पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी आणखी भडकणार

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी मोदी सरकारकडे सर्वसामान्य जनता करत आहे. याबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. अशा परिस्थितीत हिंदुस्थानातील नागरिकांच्या त्रासात भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या देशाच्या अनेक भागात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या आसपास येऊन पोहोचले आहेत. काही भागात या दरांनी शंभरीही पार केली आहे.कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे तेल उत्पादक देशांनी म्हणजेच ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वात तेल उत्पादनासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला रशियाही हजर होता. या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमती अचानक वाढायला सुरुवात झाली आहे. तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दिवसाला दहा लाख बॅरलने उत्पादन कमी करण्याचा हा निर्णय होता. ही कपात एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. उत्पादन वाढणार नसल्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढत जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

या निर्णयामुळे सगळ्यात जास्त त्रास हिंदुस्थानातील जनतेला होणार आहे. केंद्र सरकारला अपेक्षा होती की ओपेकच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतील. किंमती कमी झाल्या असत्या तर पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा लागला असता असं केंद्र सरकारला वाटत होतं. गुरुवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवून किंमतींवर नियंत्रण मिळवण्यास मदत करावे अशी विनंती केली होती. इंधनाच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी त्यावर इतर कर लावण्याऐवजी जीएसटी लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या