धावत्या दुचाकीवर चुलतभावाचा गळा चिरून निर्घृण खून

हॉटेलमध्ये दोघा चुलतभावांमध्ये झालेल्या वादातून एकाने कोतवाल असलेल्या दुसऱ्या भावाचा धावत्या दुचाकीवर धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. खेड तालुक्यातील किवळे येथे शनिवारी (दि. 11) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या चुलतभावाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 24 तासांच्या आत जेरबंद केले.

रमजान आदमभाई शेख ( वय 42,रा. किवळे, ता. खेड) असे खून झालेल्या कोतवालाचे नाव आहे. चंद्रकांत सुदाम शिवले (वय 36, रा. किवळे, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रफिक उस्मान मुलाणी (वय 35, रा. अहिरे, ता.खेड) याला अटक करण्यात आली आहे.

चंद्रकांत शिवले, रमजान शेख आणि रफिक शेख हे तिघे दुचाकीवरून पाईट ते शिरोली रस्त्याने जात होते. यावेळी रमजान व रफिक यांच्यात यापूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ कारणावरून धावत्या दुचाकीवरच वाद सुरू झाला. रफिक हा पाठीमागे बसला होता, त्याने अचानक धारदार हत्याराने मधोमध बसलेल्या रमजानचा गळा चिरला आणि दुचाकीवरून उडी टाकून तेथून पळ काढला. दरम्यान, रमजानच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपी रफिकचा शोध सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रफिक हा वडगाव मावळ फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रफिकला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, हवालदार सूर्यकांत वाणी, विक्रम तापकीर, दीपक साबळे, नाईक योगेश नागरगोजे, संदीप वारे, कॉन्स्टेबल अक्षय नवले, नीलेश सुपेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या