बोटीवर फेरफटका

संजीवनी धुरी-जाधव

जलप्रवासाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे… वेगवेगळी शहरं फिरण्याची आवड आहे आणि आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी एकदा तरी क्रुझची सफर अनुभवावी.

चहुबाजुंनी निळाशार समुद्र, अधुनमधून उफाळणाऱया लाटा असे वातावरण कोणालाही आवडेल. आज जगभरात आलिशान क्रुझवरून समुद्र पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जाते. अनेक हौशी पर्यटक समुद्र पर्यटनासाठी उत्सुक असतात. पण हे पर्यटन थोडे महाग असल्याने त्याकडे हिंदुस्थानींचा कल कमी आहे. या हौशी पर्यटकांना स्वदेशात आता क्रुझ पर्यटन करता येणार आहे. हिंदुस्थानात अलिकडे क्रुझ टुरिझमची क्रेझ वाढत चालली आहे. याच कारणाने जगभरातील अनेक जहाज कंपन्या हिंदुस्थानाकडे आकर्षित झाल्या आहेत. महाराष्ट्राला पर्यटनाचा मोठा वारसा आहे. हिंदुस्थानाला लाभलेल्या किनारपट्टीमुळे क्रुझ पर्यटनाला चांगला वाव असल्याने होमपोर्ट म्हणून मुंबईची निवड केली आहे. मुंबईचा सध्या नौदल आणि गोदीने व्यापलेला ११ किलोमीटर लांबीचा पूर्व किनारा विकसित आणि मुख्य म्हणजे खुला केला जाणार आहे. या माध्यमातून परकीय चलन वाढेल आणि रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून फक्त २ लाख पर्यटक येतात. त्याची संख्या वाढविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे लवकरत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझ टर्मिनलचे काम सुरु करण्यात आले आहे.

कोस्टा क्रूझ

इटली येथील ‘कोस्टा क्रूझ’ने मुंबई ते मालदीव या मार्गावर ‘कोस्टा निओक्लासिका’ ही क्रुझ सेवा सुरु केली आहे. कोस्टा निओ क्लासिका क्रुझ हे मुंबई-कोचिन- मालदिवदरम्यान प्रवास करणार आहे. या जहाजात ६५४ केबिन्स असून १ हजार ७०० पर्यटक प्रवास करु शकतात. या केबिन्समध्ये समुद्राचा देखावा दिसणाऱया केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सूटचा समावेश आहे. कोस्टाचे जहाज हे १७०० प्रवासी क्षमता असलेले असून ८५८ केबिनचा त्यात समावेश असेल. आतापर्यंत क्रुझ पर्यटन वाढतच गेले आहे आणि आर्थिक वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक झाले आहे. मुंबई ते कोचिन दरम्यानचा क्रुझ प्रवास ४ दिवस आणि ३ रात्री क्रुझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या ८ दिवस आणि ७ रात्रीच्या क्रुझचा असा प्रवास आहे. मुंबईतून दर पंधरवडय़ात रविवारी हे क्रुझ निघते. चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च  २०१८ पर्यंत असेल.

समुद्रातले तरंगते शहर

मनोरंजनासाठी चित्रपटगृह, साहसी खेळ, स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स, मिनी गोल्फ क्लब, अत्याधुनिक जिम्नॅशियम, क्लब्स, लाइव्ह बॅण्ड, कॅसिनो आणि उंची-अभिजात ब्रॅण्ड्सच्या शॉपिगची एक ना अनेक दालने, जिम, जॉगिंग ट्रक या सोयी-सुविधा वाचून हे एखादं सेव्हन स्टार हॉटेल असल्याच वाटतयं ना? पण या सोयी सुविधा हॉटेलमधल्या नसून ‘कोस्टा क्रूझ’ या मुंबई ते मालदीव जहाजावरच्या आहेत. एवढेच नाही तर वाचकांसाठी उत्तम व वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज ग्रंथालय आहे. त्यामुळे समुद्रातले हे तरंगत शहरच म्हणायला हवे.