जत तालुक्यातील बिळूर व डोर्ली येथे ऊस, मका, तुरीच्या पिकांत लागवड केलेला 478 किलो गांजा छापा टाकून पोलिसांनी जप्त केला. या गांजाची किंमत 47 लाख 30 हजार आहे. उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी कारवाई केली.
बिळूर येथे दुपारी कारवाईस सुरुवात केली होती. जत पोलिसांत बिळूर येथील गुरुबसू भावीकट्टी व डोर्ली मारुती रामा रूपनर व त्यांचा चुलत भाऊ विठ्ठल कृष्णा रूपनर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अवैध व्यवसाय व बेकायदेशीर गांजा लागवडीवर छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बिळूर येथे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या पथकाने गुरुबसू कल्लाप्पा भावीकट्टी यांच्या तुरीच्या शेतात छापा टाकून तब्बल 472 किलो 343 ग्रॅम इतका गांजा जप्त केला आहे. बिळूर येथील भावीकट्टी यांनी तुरीच्या शेतात गांजा लागवड केली होती. या झाडाची उंची साधारण पाच ते सहा फूट होती. पोलिसांच्या छाप्याची चाहूल लागताच संशयित आरोपी भावकट्टी फरार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, विश्वंभर पोटे, वहिद मुल्ला यांचा पोलीस पथकात समावेश होता.
डोर्ली येथे ‘ऑपरेशन मुक्ती’ या नावाने कारवाई करण्यात आली. डोर्ली येथे मारुती रामा रूपनर यांनी मक्याच्या पिकात व चुलत भाऊ विठ्ठल कृष्णा रूपनर यांनी ऊस पिकात गांजाची लागवड केली होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील व्हनखंडे व पोलीस अंमलदार एवळे यांच्यासह पोलिसांनी येथे छापा टाकला. येथून पोलिसांनी तीन ते पाच फूट उंचीची झाडे जप्त केली. याचे वजन 60 किलो भरले. तसेच घरासमोरील जनावरांच्या गोठय़ात वाळत घातलेला 60 किलो गांजा जप्त केला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत सहा लाख रुपये आहे. लातूरचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी गांजाची रोपे जप्त करीत मारुती रूपनर व विठ्ठल रूपनर या दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयित आरोपी मारुती रूपनर यास अटक केली आहे.