लोकसंस्कृती: नव्याचा दिवस..

>>डॉ. गणेश चंदनशिवे

गुढीपाडवा. आपले नवे वर्ष. या नव्या मुहूर्तावर गावागावात अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात केली जाते.

महाराष्ट्रातील सणावळीत गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून शेतकरी साजरे करीत असतात. चैत्राची चाहूल लागताच झाडांची पाणगळती सुरू होते. जुनी पाने झडून नवीन नवतीची पालवी फुटायला लागते आणि नवीन साज परिधान करून आनंदाला महोत्सवाला उधाण येते. होळीमध्ये गावात आलेली थंडी पळून जाते आणि ऊबदार वातावरणास सुरुवात होते. शेतीशी निगडित असणारा शेतकरी राजा खळय़ादळय़ाच्या राशी पुजण्यात मग्न होतात. हातात पै-पैसा खेळायला लागतो. पाडव्याच्या सणानिमित्ताने अनेक नवीन-जुने व्यवहार बदलले जातात. नवीन अवजारे खरेदी करणे, लग्नाचे बस्ते बांधणे, पै पाहुण्यांचे आदराथित्य करणे. यात्रा-जत्रानिमित्ताने गावाकडे आप्तेष्टांना बोलावणे. या सर्व बाबी पाडव्यानिमित्ताने केले जातात. ग्रामजनाची अशीही धारणा असते की, ती म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होते. या नवीन वर्षाला सकारात्मक उद्देशाने साजरे केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. त्यामुळेच तमाशाचा व्यवसाय करणारे अनेक तमाशा कलावंत तमाशाची पंढरी मानल्या जाणाऱया नारायणगाव येथे तमाशाच्या राहुटय़ा टाकतात. तिथे अनेक यात्रा-जत्रानिमित्ताने महाराष्ट्रातील हौशे-गवशे, नवशे मंडळी तमाशा ठरविण्यासाठी नारायण गावाला जाऊन तमाशाची सुपारी देतात. पाडव्याला तमाशाचा मुहूर्त करतात आणि जिथे जिथे तमाशाचा आणि तमासगिरांचा यात्रेनिमित्ताने मान आहे तेथे हाजरी लावतात.

पाडवा हा मराठी जनांच्या जीवनातील मोठा सण असल्याने महाराष्ट्रात तो मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा अतिप्राचीन असून पौराणिक आख्यानात आपणास पाडव्याचे पुरावे सापडतात. गुढीपाडव्याच्या संदर्भात एक आख्यायिका अशी की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. तो पहिला दिवस वर्ष दिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधीच्या ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. रामायणात श्रीरामचंद्राने चौदा वर्षांचा खडतर वनवास भोगून आल्यानंतर आपल्या राज्य कारभाराला पाडव्याच्या दिवशी सुरुवात केली होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद,स्त्री-पुरुष भिन्नता इ. बाबींवर मात करून आनंदाची गुढी विजयाची गुढी महाराष्ट्रभर मोठय़ा उत्सवात मराठी मन उभारते.

एका चौरंगावर एक १० ते १५ फूट लांबीचा वेळू (बांबू) उभा करून घराच्या समोर उभारला जातो.

चौरंगावर कोरे कापड टाकून हळदी-कुंकवाने त्याची विधीवत पूजा केली जाते. बांबूच्या सर्वात उंच टोकाला तांब्याचा कलश उलटा ठेवतात. त्याला चोळीचा खण बांधला जातो. कलशाला कुंकवाची पाच बोटे ओढली जातात. आंब्याची डहाळे किंवा लिंबाची पाने आजूबाजूला लटकवली जातात. संसारात आनंदमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून कलशाला साखरेच्या गाठी बांधल्या जातात आणि उत्साहवर्धक वातावरणात गुढीपाडवा सण साजरा करतात.

आपली प्रतिक्रिया द्या