लोकसंस्कृती…बहुरूढ कला

112

डॉ. गणेश चंदनशिवे

संत एकनाथांनी भारुडातून लोकप्रबोधन केले. आजच्या काळात त्यांचा हा वारसा युवा भारुडकार हमीद सय्यद पुढे चालवत आहे.

भक्ती, प्रबोधन आणि रंजन अशा तीन पातळय़ांवर महाराष्ट्रातील लोककलेने समाजावर आपला प्रभाव पाडलेला आहे. समाजाला प्रबोधनाची गरज असून प्रबोधनातून समाजाची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. जनतेचा उद्धार व्हावा, सकळ जनांनी शहाणे व्हावे, जे आपल्याला अनुभवायला मिळाले त्याचा लाभ इतरांना घेता यावा या सात्त्विक विचारातून भारुडाचा जन्म झाला. भारुडाचे नाव घेताच आपल्यासमोर संत एकनाथांचे नाव येते, परंतु त्यांच्यापूर्वीही ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज यांनी भारुडे रचली होती.

एकटय़ा एकनाथांनी सव्वाशे विषयांवर भारूडे रचली आहेत. सध्या समाजात वैचारिक समस्यांनी थैमान घातले आहे. आजच्या युवा पिढीला आणि समाजाला समाज प्रबोधनाची गरज असून असे पवित्र काम शेगाव तालुक्यातील भातकूड गावातील युवा भारूडकार हमीद सय्यद करत आहे.

पवित्र ते कुळ पावन तो देश।

जेथे हरीचे दास जन्म घेती ।।१।।

कर्म धर्म त्यांचा झाला नारायण।

त्यांचेनी पावन तिन्ही लोक ।।२।।

वरील संत तुकारामांच्या अभंगात सर्व जाती धर्मातील संतांचे वर्णन आलेले आहे. या वारकरी संप्रदायाच्या शिकवणीतून प्रेरित होऊन हमीद सय्यद यांनी मुसलमान असूनदेखील वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन वयाच्या पाचव्या वर्षापासून भारुडाची परंपरा जोपासली आहे.

हमीदला उपजत असलेल्या गायकीला ओळखून शिवशाहीर कल्याण काळे यांनी हमीदवर भारुडाचे संस्कार केले. पुढे हमीदने भारूड गायनाचे, निरूपणाचे, संवादाचे आणि विनोदाचे तंत्र स्वतः तयार केले. पुढे प्रेक्षकांनी हमीदवर कौतुकाचा वर्षावच सुरू केला आणि इथूनच हमीदचे संपूर्ण आयुष्याच भारूडमय झाले आणि भारूडकार हमीद सय्यद नावारूपाला येऊ लागले.

रोजच्या दैनंदिन जीवनातील दृष्टांत, उदाहरणाद्वारे, प्रतिकांद्वारे आपण भगवंतांचे अध्यात्म समाजापर्यंत पोहोचवू शकतो हे मर्म जाणून हमीदने पुढे समाजाचे प्रबोधन, उद्बोधन व्हावे म्हणून भारूडाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. भारुडातील सोंगातून समाजातील जातीव्यवस्था, तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण, पर्यावरण बचाव, बेटी बचाव आदी विषयांवर हमीद सय्यद सहज, साध्यासोप्या भाषेतून मार्मिक भाष्य करतो. त्याच्या दादला, आंधळा-पांगळा, पोतराज, जोशी, गोंधळी या पात्रांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. भारूडकार हमीद सय्यदने आतापर्यंत तीन हजारांवर कार्यक्रम केले आहेत आणि तो आजतागायत अविरतपणे करत आहे. हमीदला भारूडकार म्हणून संत एकनाथांच्या वंशजांकडून पैठणला मिळालेली कौतुकाची थाप, तो क्षण हमीदच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या