नाळविक्रीतून नफेखोरी करणाऱ्यांना आवरा!

सामना ऑनलाईन, मुंबई

कोलकात्यातील अल्बर्ट डेव्हिड ही कंपनी मानवी नाळेचा वापर करून प्लॅसेंटा एक्स्ट्रक्ट हे औषध तयार करीत आहे. हे औषध उपलब्ध करण्यासाठी बाळाची नाळ कोठून उपलब्ध केली जाते, किती नाळांपासून औषधे बनविली जातात, अशा प्रकारे औषध विक्री करून कोटय़वधी रुपयांची नफेखोरी करणाऱ्या तसेच नाळ विक्रीचा गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली.

मुंबईसह राज्यभरात असलेली प्रसूतीगृहे पालकांची परवानगी न घेता बाळाची नाळ खासगी औषध निर्मात्या कंपन्यांना विक्री केल्याचा गैरव्यवहार 6 मे रोजी निदर्शनास आल्याची बाब सुनील प्रभू यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केली. या नाळेतील रक्त घटकांपासून बनलेली औषधे दुर्धर आजारावर उपयोगी असल्याचा दावा या कंपन्यांकडून करण्यात येतो. या कंपन्यांची वार्षिक उलाढाल दीडशे कोटींहून अधिक आहे. नाळेचा औषधासाठीच्या वापरावर राज्य शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अशी प्रसूतीगृहे व औषध कंपन्यांवर कोणती कारवाई केली जात नाही. याबाबत शासन तातडीने काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी या प्रश्नाद्वारे केला.

पश्चिम बंगालच्या परवान्यावर काम

पश्चिम बंगाल सरकारच्या परवान्याच्या नावाखाली मुंबईत प्लॅसेंटा एक्स्ट्रक्ट हे औषध विक्री करीत कोटय़वधी रुपयांची नफेखोरी केली जाते. केंद्रीय तथा राज्य अन्न व औषध विभागातर्फे कारवाई करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी बाळाच्या नाळेतील रक्त साठवून त्याचा वापर बाळासाठी किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी करण्याकरिता अन्न व औषध प्रशासन परवाना मंजूर करते. बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या राज्यात नाहीत. औषधी उत्पादन करण्यासाठी तसेच इतर औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल शासकीय यंत्रणेद्वारे संचालित 32 आरोग्य संस्थांकडून प्राप्त करण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेली आहे. या कंपन्यांचे परकाने कैध असल्याचे येरावार यांनी आज सांगितले.