श्रीलंकेत संचारबंदी उठवली; 60 दंगलखोरांना अटक

सामना ऑनलाईन । कोलंबो

बॉम्बस्फोटांनंतर उसळलेल्या धार्मिक  दंगलीला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी दोन दिवसांनंतर मागे घेण्यात आली. संचारबंदीच्या काळात मुस्लीम वस्त्या, मशिदी आणि दुकानांवर हल्ले करणाऱ्या 60 दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीलंकेतील काही भागांत अजूनही काही प्रमाणात जमावाकडून हिंसक घटना सुरू आहेत. ज्या भागात तणाव निवळला आहे, अशा भागांतून संचारबंदी काढून टाकण्यात आली आहे. काल रात्रभर मात्र हिंसाचाराची एकही घटना घडलेली नाही. 60 जणांना दंगल केल्याप्रकरणी अटक केली असून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी सांगितले.

संचारबंदीच्या काळात पोलीस आणि लष्कर रस्त्यावर असतानाही दंगलखोरांनी आमच्या वस्ती आणि दुकानांवर हल्ले केले. यात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा मुस्लीम समुदायाकडून करण्यात आला. दरम्यान, संचारबंदी मागे घेतल्यानंतर शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली. मात्र, देशभरात ड्रोन आणि सोशल मीडियावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

बघ्याची भूमिका घेणाऱ्या जवानाचा शोध सुरू

संचारबंदीच्या काळात थुंमाडोरा भागांत मुस्लीम वस्ती आणि दुकानांवर हल्ला झाला असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या श्रीलंकन जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा जवान कोण, याचा शोध लष्कराने घ्यायला सुरुवात केली आहे. हा खरोखरच जवान असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.