‘करी रोडचा राजा’साठी साकारतेय ओडिशातील जगन्नाथपुरी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून गिरणगावात सामाजिक संदेश देणाऱ्या करी रोड पश्चिम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा यंदा जगन्नाथपुरीच्या मंदिरात विराजमान होणार आहे. दिवंगत विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले कलाकार बाप्पासाठी ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा भव्य देखावा उभारत आहेत.

करी रोड पश्चिम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. करी रोड परिसरातील हे जुने गणेशोत्सव मंडळ असल्याने या मंडळाचा गणपती ‘करी रोडचा राजा’ म्हणून ओळखला जातो. या वर्षी मंडळाच्या वतीने जगन्नाथपुरीचा देखावा साकारला जात आहे. कलाकार दर्शन बाबूराव मासावकर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

पुरीच्या मंदिरातील बलराम, सुभद्रा आणि जगन्नाथाची मूर्ती मासावकर यांनी या देखाव्यासाठी बनवली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘राजू चाचा’, ‘बादशहा’ आदी चित्रपट तसेच दूरदर्शनवर गाजलेल्या ‘चंद्रकांता’ मालिकेतील भव्य सेट उभारण्याचा अनुभव मासावकर यांना आहे. हा देखावा 22 फूट उंच असणार आहे. त्यात मंदिरातील आरास हुबेहूब साकारली जावी असा आमचा प्रयत्न आहे, असे मासावकर यांनी सांगितले.

यंदाचा बाप्पा आरोग्यरक्षक

केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर इतरही आपत्तींच्या वेळी आमचे मंडळ मदतीसाठी सदैव तत्पर असते. यंदाचा आमचा बाप्पा आरोग्यरक्षक असेल म्हणजेच मंडळाच्या वतीने आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन आम्ही करणार आहोत. त्यात रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर यासह आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष अमित घाडीगावकर यांनी दिली.