बिअर प्यायला आला आणि 2 लाख रुपयांची टीप देऊन गेला

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बहुसंख्ये देशांनी लॉकडाऊन घोषित केला होता. या काळामध्ये उद्योग धंदे ठप्प झाल्याने व्यावसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर हळूहळू जगभरातील उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले असून त्यांनी पूर्वीचा वेग गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मात्र अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असल्याने तिथे पुन्हा परिस्थिती बिकट बनत चालली आहे. या बिकट परिस्थितीमुळे अमेरिकेतील एका हॉटेल चालकाने स्वेच्छेने त्याचं हॉटेल बंद करायचं ठरवलं होतं.

रविवारी नाईन टाऊन नावाच्या या हॉटेलचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. रविवारी या हॉटेलमध्ये एक ग्राहक आला होता. त्याने 7 डॉलर्सची बिअर विकत घेतली होती. बिअर संपवून जात असताना तो इतर ग्राहकांप्रमाणे टीप ठेवून गेला. ती टीप जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी बघितली तेव्हा ते उडालेच होते. या ग्राहकाने 3 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 2 लाख रुपयांची टीप ठेवली होती.

नाईन टाऊन हॉटेलचा मालक ब्रँडन रिंग याने एक फेसबुक पोस्ट लिहित या घटनेची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की या ग्राहकाला कळालं होतं की हे हॉटेल अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे त्याने देवाकडे सगळ्यांच्या भल्याची प्रार्थना केली आणि चार वेटरना टीप वाटून घेण्यास सांगितले.

रिंग यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की ग्राहक हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी टीपची रक्कम पाहिली 3 हजार डॉलर्सची रक्कम पाहून त्यांना वाटलं की ग्राहक त्याचे पैसे विसरून गेला आहे. रिंग या ग्राहकाच्या मागे पळत गेले आणि त्यांनी त्या माणसाला गाठलं. पैसे विसरलात का असं विचारलं असता त्या माणसाने हसून रिंग यांना म्हटलं की जेव्हा तुम्ही पुन्हा हॉटेल सुरू कराल तेव्हा अशी चूक करणार नाही. रिंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ग्राहकाचं नाव लिहिलं नाहीये, मात्र त्यांनी त्याच्या उदारपणाबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या