महावितरणची वीजतोडणी सुरूच; आणखी दीड हजार जणांवर कारवाई

35

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

थकबाकी वसुलीसाठी महावितरणची वीजतोडणी सुरूच असून, काल मंगळवारी १ हजार ४१५ जणांवर कारवाई करण्यात आली. २० दिवसांत तब्बल २५ हजार ७६४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

शहरातील दोन्ही विभागांतील थकबाकीदारांना शॉक देण्यासाठी महावितरणची मोहीम २० दिवसांपासून अखंडपणे सुरू आहे. काल मंगळवारी पथकांनी विविध भागांत थकबाकी भरणा न करणाऱ्या १ हजार ४१५ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये पॉवर हाऊस उपविभागात १३३, छावणीत ४२६, शहागंजात ३०४, चिकलठाण्यात ४०८, गारखेड्यात ५५ तर क्रांतीचौक उपविभागात ८९ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे थकबाकीदार ग्राहकांकडून १६ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली झाली आहे. महावितरणने थकबाकी वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही थेट निलंबनाची कारवाई सुरू केल्याने मोहिमेत थकबाकीदारांवर कारवाई करतानाच वसुलीचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत थकबाकीदार ६० हजार ४९८ पैकी ३४ हजार ७७३ ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे.

सहव्यवस्थापकीय संचालकांचा वॉच
महावितरणने थकबाकी भरणा करा, अथवा वीजतोडणी करू, असा पवित्रा घेतला असल्याने शहरात २० दिवसांत २५ हजार ७६४ ग्राहकांचा तात्पुरता तर ४०५ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या मोहिमेत अधिकारी – कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांची वीज खांबावरून तोडण्याऐवजी वीजमीटरपासून तोडली होती. कारवाईनंतर अनेक ग्राहकांनी खासगी वायरमनकडून वीजजोडणी करून घेतली होती. त्यामुळे थकबाकी भरणा करण्याचे प्रमाण नगण्य होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया आणि मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी थकबाकीदारांची वीज खांबावरून तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई होते विंâवा नाही, यावर हे दोन्हीही अधिकारी वॉच ठेवून आहेत. कारवाई झालेल्या अनेक भागांत त्यांनी भेटी देऊन पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या