हिंदुस्थानची बॉक्सिंगमध्ये सहा पदके निश्चित

सामना ऑनलाईन । गोल्ड कोस्ट

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या वेटलिफ्टर्संनी पदकांची लयलूट केल्यानंतर नेमबाजांनीही पदकांमध्ये भर घालण्यास सुरुवात केली आहे. टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या प्रकारात हिंदुस्थानला पदके मिळाली आहेत. त्यापाठोपाठ आता बॉक्सिंगमध्येही हिंदुस्थानची सहा पदके निश्चित झाली आहेत. बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानच्या मनोज कुमारने ६९ किलो कजनी गटात उपांत्य फेरी गाठून हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले. मनोजने उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रेलियाच्या टेरी निकोलसचा ४-१ गुणफरकाने पराभव केला. ५६ किलो कजनी गटात हिंदुस्थानच्या मोहम्मद हसीमुद्दीनने जांबियाच्या एविरिस्टो मुलेंगाचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली. ९१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्या नमन तकंरने सोमाआच्या फ्रँक मासोचा पराभव करत आगेकूच केली. याचबरोबर अमित फांघलने ४९ किलो गटात अमित पांघलने स्कॉटलंडच्या अकिल अहमदला धुळ चारून उपांत्य फेरी गाठली. सतिश कुमारनेही हेविवेट गटात उपांत्य फेरी गाठून हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले. याचबरोबर महिला बॉक्सर एमसी मेरीकोमनेही उपांत्य फेरी गाठलेली असल्याने हिंदुस्थानची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहा पदके आधीच पक्के झाली आहेत. फक्त त्या पदकांचा रंग कोणता असेल, त्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.