इन्स्टाग्रामवरील क्रिप्टो करन्सी-सुलतान 02 या ग्रुपच्या माध्यमातून कोलकातातील सायबर भामटय़ांनी मुंबईतील एका तरुणाला जास्त नफा मिळवून देण्याची बतावणी करत पावणेतीन लाखाला चुना लावला. परंतु डी. बी. मार्ग पोलिसांनी तपास करत सय्यद मो. अतेहसमुल इबारूल हक, इम्रान सय्यद अली या दोघांना पकडले आणि दीड लाखाची रोकड हस्तगत केली.
मालाड येथे राहणारा अहमद सलीम अन्सारी (22) इन्स्टाग्रामवरील करन्सी-सुलतान 02 या ग्रुपचा सदस्य बनला होता. तेथे तो नियमित चॅटिंग करायचा. तू क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केलीस तर चांगला नफा मिळेल असे आमिष त्याला आरोपींनी दाखवले. त्यावर विश्वास ठेवून त्याने दोन लाख 84 हजार रुपये आरोपींनी पाठविलेल्या क्यूआर कोडवरून पाठविले. पण नंतर आरोपींनी त्याला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अन्सारीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे, निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे, उपनिरीक्षक अभिषेक अरडक, अंमलदार सूरज धायगुडे व पथकाने तपास सुरू केला. अन्सारी याचे पैसे कोलकाता येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे व तेथीलच एका एटीएममधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पथकाने कोलकाता गाठले आणि या दोघांना पकडून आणले.
पुरावे नष्ट, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू
आरोपींचा तिसरा साथीदार फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांना आपल्या विरोधात सबळ पुरावे मिळू नये याकरिता आरोपींना ते इन्स्टाग्राम वापरत असलेला मोबाईल तोडून फोडून फेकून दिला. आरोपीने सदरचे इन्स्टाग्राम खाते खोलून तो हक याला विकले होते.