नोकरीच्या आमिषाने उच्चशिक्षित महिलांना 6 लाखांचा गंडा, पुण्यातील घटना

सोशल मीडियावर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याच प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषतः पोलिसांच्या आवाहनाकडे कानाडोळा करून अनेकजणांकडून बतावणीला बळी पडण्याचे प्रकार कायम आहे. असाच प्रकार पुण्यात घडला असून नोकरीच्या आमिषाने दोन उच्चशिक्षित महिलांना 6 लाखांचा गंडा घातला गेला आहे. याबाबत वाघोली परिसरातील एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. त्यांना बड्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी नोकरीविषयक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही रक्कम महिलेला बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. महिलेकडे वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करून महिलेला बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगून महिलेची एकूण मिळून 4 लाख 51 हजार 504 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तपास करत आहेत.

तसेच वानवडी भागातील तरूणीची नोकरीच्या आमिषाने 1 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक करण्यात केली आहे. तरूणीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहीरात पाहिली होती. त्यानंतर त्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी चोरट्याने ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री केल्यास भरपूर नफा होईल, असे आमिष दाखविले होते. त्यानुसार नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगितले. नोकरीसाठी वेळोवेळी पैसे पाठवून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तरूणीने तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या