क्रेडिट कार्ड अपडेटच्या नावाने फसवणूक, दिल्लीतून चार भामट्यांना बेड्या

क्रेडिट कार्डचे अपडेट तसेच क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवून देतो, अशी बतावणी करत लालबागमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी हजारो रुपयांचा चुना लावला होता. काळाचौकी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून दिल्लीतून चार सायबर भामट्यांना अटक करून आणले आहे.

दीपक जैन (32) हा तरुण लालबाग येथे राहतो. त्यांच्या मोबाईलवर एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला व क्रेडिट कार्ड अपडेट आणि क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवून देतो सांगितले.   त्याला एका संकेतस्थळावर बँकेची माहिती भरायला लावली व त्या माहितीच्या आधारे दीपकच्या मोबाईलचा बेकायदेशररित्या ताबा मिळवला. मग  त्याच्या सहमतीशिवाय क्रेडिट कार्डवरून 92 हजारांची अफरातफर करून दीपकची आर्थिक फसवणूक करण्यात आली. काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, शीतल माने तसेच अंमलदार सुभाष रासवे, गोपाळ चव्हाण या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता आरोपी छत्तरपूर येथे असल्याचे कळताच पथकाने तेथे जाऊन साजिद खान या आरोपीला आधी उचलले. मग त्याच्या चौकशीत अन्य तिघांची नावे समोर आल्यानंतर समीर खान, परवेझ खान व नदीम चौधरी अशा चौघांना पकडून मुंबईत आणण्यात आले.