नोकरीच्या नावाखाली 25 हजार जणांना गंडा, 4 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

नोकरीच्या नावाखाली 25हून अधिक जणांना चुना लावणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिल्लीच्या दक्षिण भागातील सायबर पोलिसांनी बरेली इथे चालणाऱ्या एका कॉलसेंटरचा पर्दाफाश केला आहे. आरोपींच्या खात्यातून कोट्यवधींची देवाण-घेवाण सुरू असल्याचंही उघड झालं आहे.

हे आरोपी अनेक बेरोजगार तरुणांना मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवत होते. त्यांच्याकडून पैसे घेत होते. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या चौघांनी मिळून सुमारे 25 हजारहून अधिकांना चुना लावला आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे नकली कॉलसेंटर सुरू होतं. फसवणूक झालेल्यांपैकी बहुतांश तरुणी आहेत.

या प्रकरणी एका महिलेने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनुसार, शाईन डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवर तिने नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर तिला हल्दीराम कंपनीत नोकरी देण्याचं कारण देत एचआर मॅनेजरकडून तीन वेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले. या वेळी तिच्याकडून पैसे घेऊन तिला व्हॉट्सअॅपवर हल्दीरामच्या लेटरहेडवर एक जॉईनिंग लेटरही पाठवण्यात आलं. ते पत्र घेऊन जेव्हा ती हल्दीरामच्या कार्यालयात पोहोचली, तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचं कळलं.

या प्रकरणाच्या तपासावेळी तिने पैसे ट्रान्सफर केलेल्या बँक खात्यांचे तपशील पोलिसांनी तपासले. त्यांच्या तपशीलासोबत महिलेला आलेल्या फोन क्रमांकाचीही तपासणी केली गेली. तेव्हा हे फोन बरेलीचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बँक खात्याचे तपशील आणि मोबाईल फोन सीडीआरच्या तपासणीत या टोळक्याने 25 हजारांहून अधिकांना चुना लावल्याचं उघड झालं.

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. प्रांशू उर्फ अंशुल, हिमांशु उर्फ विशाल, पंकज पांडे उर्फ पांडे आणि दीपक कुमार यादव अशी या चौघांची नावं आहेत. त्यांच्याकडे 23 कीपॅड मोबाईल फोन, अनेक सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि एक नोंदवही अशी सामग्री जप्त करण्यात आली आहे.