रत्नागिरी – व्हिडीओ कॉलवर महिला निर्वस्त्र झाली, ब्लॅकमेल करून तरुणाला 50 हजारांना लुबाडले

मोबाईलवरील व्हिडीओ कॉलद्वारे एका महिलेने तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हिडीओ कॉल करणार्‍या महिलेने निर्वस्त्र होऊन तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यालादेखील निर्वस्त्र होण्यास भाग पाडून संबंधित महिलेने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर ती व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 50 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आणि तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (24 नोव्हेंबर) दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधून विश्वास संपादन केला. महिलेने स्वतः निर्वस्त्र होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले. तसेच पीडित तरुणाला देखील निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

त्यानंतर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाईलवर फोनद्वारे धमकी आली. तुझा व्हिडीओ तयार करण्यात आलेला असून तो युट्यूबवर टाकतो अशी धमकी देत गुगल पे व्दारे 50 हजार 500 रुपये घेऊन फसवणूक केली. या प्ररकरणी पीडिताच्या तक्रारीनंतर अज्ञात महिलेविरोधात कलम 420, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.