मुंबई उतरणार सायकल ट्रॅकवर, रविवारपासून एनसीपीए ते वरळी सुसाट

47

सामना प्रतिनिधी । मुंबई

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सायकल ट्रकला येत्या रविवारपासून सुरुवात होणार आहे. एनसीपीए ते वरळी सी लिंकपर्यंत 11 कि.मी.च्या मार्गावर सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत मुंबईकरांना या सायकल ट्रकवर येता येणार आहे. टू वे अर्थात दुतर्फा असलेल्या या ट्रकवर सायकलप्रेमींना सायकल आणि हेल्मेट भाडय़ाने देण्याचीही सोय देण्यात आली आहे. समुद्राच्या सोबतीने मुंबईकरांना यापुढे दर रविवारी सकाळी पालिकेच्या वतीने हा सायकल ट्रक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ओपन थिएटर सुरू केल्यानंतर आता दर रविवारी मुंबईकरांसाठी सायकल ट्रक सुरू केला जाणार आहे. वायुप्रदूषण टाळावे, आरोग्याचे महत्त्व पटावे याकरिता पालिकेच्या वतीने दर रविवारी आणि काही शनिवारी सायकल ट्रक तयार केला जाणार आहे. सायकल ट्रकसाठी बॅरिकेटस् टाकणे व अन्य पायाभूत सुविधा महानगरपालिकेर्फे तयार केल्या जाणार आहेत. सायकल ट्रकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वयन करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह / स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले होते. हॅण्डल बार आणि स्मार्ट कम्युट फाऊंडेशन अशा दोन संस्थांना तीन महिन्यांसाठी हे काम देण्यात आले असल्याची माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

सर्व परवानग्या मिळाल्या

सायकल ट्रकसाठी लागणाऱया सर्व परवानगया पालिकेला मिळाल्या आहेत. हेरिटेज समिती आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती, वाहतूक विभाग यांच्या परवानग्या मिळाल्या आहेत. हा सायकल ट्रक आणि भाडय़ाने सायकल घेण्यासाठी उभी केली जाणारी जागा हे सारे तात्पुरत्या स्वरूपात असेल. सकाळी 11 वाजल्यानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे.
-किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड

असा असेल मार्ग

हा सायकल ट्रक एनसीपीए -नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राइव्ह) — बाबुलनाथ — गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) — ऍनी बेझंट मार्ग — खान अब्दुल गफार खान मार्ग — राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी लिंक) अशा सुमारे 11 कि.मी.च्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच 22 कि.मी. एवढय़ा अंतराचा असेल.

दोन्ही बाजूला 4 मीटरचा ट्रक बॅरिकेटस् टाकून करण्यात येणार आहे.

ज्यांच्याकडे सायकल नाही त्यांना सायकल भाडय़ानेही मिळू शकणार आहे. एनसीपीएचा स्टार्टिंग पॉइंट, गिरगाव चौपाटी, हाजी अली आणि वरळी सी फेस अशा चार ठिकाणी सायकल आणि हेल्मेट, पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या