बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत- हवामान विभाग

अमोल कुटे । पुणे

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणखी तीव्र होत आहे. चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्याकडे वेगाने झेपावत असून, ते मंगळवारी दुपारी बंगलादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात गुरूवारी (दि.२५) तयार झालल्या कमी दाब क्षेत्राची बळकटी वाढत असल्याने १२ तासांत त्याचे लघू वादळात (डीप डीप्रेशन) रुपांतर होणार आहे. तर त्यापुढील १२ तासांत या भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी उपसागरात सकाळी ८.३० वाजता ताशी ४० किलोमीटर वेगाने चक्राकार फिरणाऱ्या वाऱ्यांसह हे क्षेत्र ताशी ३ किलोमीटर वेगाने बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे सरकत होते. त्याचा केंद्र बिंदू, कोलकात्याच्या दक्षिणेला ९०० किलोमीटर तर बांगलादेशच्या चितगावपासून ८९० किलोमीटर समुद्रात होता. बंगालच्या उपसागरात ढगांनी दाटी केली असून, किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॉन्सून गतिमान होणार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) वाटचालीसाठी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरते. सध्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची वाटचालही गतिमान होणार असून, येत्या २४ तासांमध्ये (सोमवारपर्यंत) मालदीवसह अरबी समुद्रात मॉन्सूनची प्रगती होणार आहे. बुधवारपर्यंत मान्सून केरळ, आणि ईशान्य हिंदुस्थानातील राज्यात दाखल होणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या