तामिळनाडूला ‘निवार’ चक्रीवादळाचा धोका; एनडीआरएफची पथके सतर्क

तामिळनाडू आणि पद्दुचेरीला ‘निवार’ चक्रीवादळाचा धोका असून एनडीआरएफचे पथक सतर्क आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळपर्यंत ममल्लापूरम आणि कराइकलच्या समुद्रकिनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावेळी ताशी 120 ते 130 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये चक्रीवादळाचे परिणाम दिसत असून अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्यता वर्तवल्याने अनेक फ्लाइट आणि रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. तर इंडिगोने 49 उड्डाणे रद्द केली आहेत. हवामान खात्याने तामिळनाडू आणि पद्दुचेरीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळाची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची पथके सतर्क असून त्यांनी संभाव्य संकटाशी मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे.

तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने समुद्र किनारी 465 अॅम्बुलन्स तैनात ठेवल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता चेन्नईमध्ये 129 मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत. तर 8 शिबिरांमध्ये 312 जणांनी आश्रय घेतला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई, नागापट्टीनम,कुड्डालोर,विल्लुपुरम, तंजावर, चेंगाल्पेट, आरियालूर, पेरमबलूर, कलाकुरुची,तिरुवन्नामलाई आणि तिरुवल्लूरमध्ये वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पद्दुचेरी आणि कराईकलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाची तीव्रता वाढल्यास आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण ओडिशालाही वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागात वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस होत आहे. या पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे.

वादळाची शक्यता लक्षात घेता पद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असल्याचे पद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सांगितले. जनतेच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. जनतेला सुरक्षितस्थळी हलवून त्यांना पाणी, खाद्यपदार्थ आणि औषधे पुरवण्यात येत आहेत. तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या