दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त चित्रपट इतिहासाचा खजिना रसिकांसाठी खुला

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 151व्या जयंतीचे औचित्य साधून पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने खास खजिना रसिकांसाठी ऑनलाईन खुला केला आहे. चित्रपटसृष्टीच्या मौखिक इतिहासाचा हा संग्रह असून त्यात अनेक कलावंतांच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा समावेश आहे.

साधारण आठ हजार मिनिटांचा मौखिक इतिहास संग्रहालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मूकचित्रपट ते अलीकडच्या काळातील अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडियो मालक यांचा अद्भुत इतिहास ऐकता येईल. यात मराठी, तमीळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेत 53 कलावंतांच्या मुलाखती आहेत. चित्तरंजन कोल्हटकर, गणपतराव बाकरे, हरिभाऊ लोणारे, चंद्रकांत गोखले, व्ही. गोपालकृष्णन, एस.डी. सुब्बुलक्ष्मी, एस.व्ही. वेंकटरमण, सौमित्र चॅटर्जी, ए.एस. नागराजन, जे.बी.एच. वाडिया यांच्या मुलाखतींचा अंतर्भाव आहे.

दादासाहेब फाळके यांच्या जुन्या सहकाऱयांच्या घेतलेल्या मुलाखती हे प्रकल्पाचे वैशिष्टय़ आहे. देशातील पहिल्या बालकलाकार, दादासाहेब फाळके यांच्या कन्या मंदाकिनी फाळके-आठवले यांची मुलाखत ही प्रकल्पाची खासियत आहे. बापू वाटवे यांनी प्रामुख्याने मराठीतील मुलाखती घेतल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या