पुरुषोत्तम मास

1144

>>दा. कृ. सोमण – पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

अधिक मास सुरू झाला आहे. श्री विष्णूचा महिनात्यामुळे समस्त जावईबापूंच्या कौतुकाचा महिना. अधिक मासाचा खरा अर्थ पाहूया.

यावर्षी १६ मे ते १३ जून २०१८ अधिक ज्येष्ठमास आला आहे. त्यामुळे हे चांद्रवर्ष १३ महिन्यांचे झाले आहे. अधिक महिन्यास पुरुषोत्तममास, मलमास, संसर्पमास, धोंडय़ा महिना असेही म्हणतात. प्राचीन काळापासून शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सण-उत्सवांची योजना केलेली आहे. शरीराचे आरोग्य आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. ठरावीक सण हे ठरावीक ऋतूमध्ये येण्यासाठी आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यांत हलक्या आहाराची जरूरी असते म्हणून उपवासाचे दिवस हे श्रावण महिन्यात येत असतात. थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते, शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते म्हणून दिवाळीसारखे सण थंडीत येत असतात. तीळ हे थंडीत आरोग्यास उपयुक्त असतात म्हणून मकर संक्रांतीसारखा सण थंडीत येतो. उत्सव हे मनाचे आरोग्य चांगले ठेवतात.

कालगणनेत चांद्र-सौर पद्धतीचा मेळ राहावा यासाठी एक नियम करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी सूर्य एका राशीत असताना दोन चांद्रमहिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास धरला जातो. ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास धरला जातो. तीस तिथींचा एक चांद्रमास व ३६० तिथींचे एक चांद्रवर्ष होते.

एक सौरवर्ष ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे व साडे ४७ सेकंदांचे असते. या कालात सुमारे ३७१ तिथी होतात. एक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथींनी लहान असते. एकदा अधिकमास आल्यापासून मध्यम मानाने साडे ३२ चांद्रमहिन्यांनी पुन्हा अधिकमास येतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन यापैकी कोणताही महिना अधिकमास येऊ शकतो. चांद्र महिन्यात सूर्याच्या राशीप्रवेश दोनदा झाला तर क्षयमासही येऊ शकतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष यापैकी कोणताही क्षयमास होऊ शकतो.

अधिकमासातील कर्तव्ये 

अधिकमासात महिनाभर उपोषण, अयाचित-नक्तभोजन करावे. एकदाच जेवावे. देवदर्शन घ्यावे. देवापुढे अखंड दीप लावावा. अधिकमासात ३३ अपूप म्हणजे अनरसे यांचे दान करावे. ३३ अनरशांचा नैवेद्य भगवान विष्णूला अर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. जावई हा विष्णुसमान असतो म्हणून ३३अनरसे हे जावयाला देण्याची प्रथा पडली असावी. दान म्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देणाराचे नाव जाहीर केले जाते. तसेच काय डोनेशन दिले तेही जाहीर केले जाते. पण दानाचे तसे नसते. कोणी दान दिले, काय दान दिले आणि कोणाला दान दिले हे गुप्त ठेवायचे असते. असं म्हटले जाते की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये. गरीब, गरजू लोकांना मदत मिळावी हा दानसंस्कृती मागचा उद्देश आहे. आधुनिक काळात अधिकमासामध्ये ग्रंथदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, विद्यादान, अर्थदान करणे अधिक योग्य होईल. दान केल्याने याच जन्मात समाधानाचे पुण्य मिळते. अधिकमासात नित्य नैमत्तिक कर्मे करावी. नामकर्म, अन्नप्राशन या गोष्टी अधिकमासात करावयास हरकत नाही. चौल, उपनयन, विवाह, वास्तुशास्त्रात गृहारंभ या गोष्टी अधिकमासात करू नयेत असे सांगण्यात आले आहे.

या अधिकमासानंतर येणारे अधिकमास

(१) १८ सप्टेंबर ते १६ आक्टोबर २०२० आश्विन, (२) १८ जुलै ते १६ आगस्ट २०२३ श्रावण, (३) १७ मे ते १५ जून २०२६ ज्येष्ठ, (४) १६ मार्च ते १३ एप्रिल २०२९ चैत्र, (५) १९ आगस्ट ते १६ सप्टेंबर २०३२ भाद्रपद, (६) १७ जून ते १५ जुलै २०३४ आषाढ (७) १६ मे ते २३ जून २०३७ ज्येष्ठ (८) १९ सप्टेंबर ते १७ आक्टोबर २०३९ आश्विन, (९) १८ जुलै ते १५ आगस्ट २०४२ श्रावण, (१०) १७ मे ते १५ जून २०४५ ज्येष्ठ, (११) १५ मार्च ते १३ एप्रिल २०४८ चैत्र (१२) १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०५० भाद्रपद.

‘वर्षप्रबोध’ या ग्रंथामध्ये प्रत्येक अधिकमासाचे फल देण्यात आले आहे. ‘ज्येष्ठ अधिकमास’ आला असता त्यावर्षी पाऊस खूप पडेल असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात हे भाकीत सुखावह आहे हे नक्कीच!

आपली प्रतिक्रिया द्या