रोज पूजा का करावी

1586

>>दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते

बऱ्याच घरांत रोज देवपूजा केली जाते. ही पूजा मानसिक समाधान देणारी असते, पण या रोजच्या पूजेमागील शास्त्रीय कारण जाणून घेऊया.

‘‘रोज पूजा का करायची ?’’ असा प्रश्न काही लोक विचारीत असतात. काही लोकांना पूजा करणे हे एक ‘काम’ वाटते, तर काही लोक मनापासून रोज पूजा करताना आपल्याला दिसून येतात. ‘‘देवाला घाबरून आम्ही रोज पूजा करतो’’ असेही काही लोक सांगत असतात. दररोज पूजा केल्याने देव आपणांस सुख प्राप्त करून देतो असेही काहींना वाटत असते.

देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधियुक्त उपचार समर्पण करणे यालाच ‘पूजा’ म्हणतात. ‘पूज् पूजयति’ म्हणजे पूजा करणे, आदर व्यक्त करणे, सन्मान करणे यापासून ‘पूजा’ शब्द तयार झाला आहे.

‘तंत्र पूजा नाम देवतोद्देशेन द्रव्यत्यागात्मकत्वाद्याग एव’ म्हणजे देवतेला उद्देशून द्रव्यत्याग केला जात असल्यामुळे पूजा म्हणजे ‘त्यागच’ होय असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलेले आहे. पूजा ही देवावर उपकार म्हणून करावयाची नसते. देवतेत चांगला बदल व्हावा यासाठीही करायची नसते. पूजा ही आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर पूजा म्हणजे त्याग! तो केल्याने आपल्या स्वभावात नम्रता येते, आपले मन सात्त्विक राहते, मनाला निर्भयता प्राप्त होते, आपले मनोबल वाढते. गरीब गरजूंना मदत करण्याची, त्यांच्यासाठी त्याग करण्याची आपणांस सवय होते. पूजा हे काम म्हणून करावयाचे नसते, पूजा हे कर्तव्य म्हणून करावयाचे असते. आपण किती वेळ पूजा करतो, किती मौल्यवान साहित्याने पूजा करतो हे इथे महत्त्वाचे नसते. आपण किती पवित्र भावनेने, किती श्रद्धेने, मनाची एकाग्रता साधून आणि मनोभावे पूजा करतो हे इथे महत्त्वाचे असते. समर्पणाची भावना महत्त्वाची असते. इथे सातत्य महत्त्वाचे असते. दररोज पूजा करूनही आपले मन अस्वच्छ राहिले, अनीती, आळस, अविचार, भ्रष्टाचार, अस्वच्छ, व्यसन करीत राहिलो तर पूजा करणे व्यर्थ आहे. पूजा ही मनापासून केली पाहिजे. आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठीच करावयाची असते.

या सृष्टीमध्ये असलेले निसर्गातील ‘चैतन्य’ म्हणजेच ईश्वर! हे चैतन्य चराचरात असते. निर्गुण, निराकार ईश्वराची उपासना करणे तशी कठीण गोष्ट आहे. म्हणून सगुण उपासना मूर्तिपूजेच्या रूपात सुरू झाली. सामान्य माणसाला मूर्तीची पूजा करणे सुलभ जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प या सोळा उपचारांनी करावयाच्या पूजेला ‘षोडशोपचार पूजा’ म्हणतात. ज्याला षोडशोपचार पूजा करणे शक्य नसेल त्याने शक्य असतील त्या उपचारांनी पूजा केली तरी चालते. ‘पूजाप्रकाश’ ग्रंथात असे सांगितलेले आहे की, फूल न मिळाल्यास फळ, ते न मिळाल्यास पान, तेही न मिळाल्यास जल आणि तेही न मिळाल्यास अक्षतांनी देवाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे.

पूजेचा इतिहास

पूजा ही आर्य संस्कृतीला द्राविड संस्कृतीकडून मिळालेली देणगी आहे. आर्यांना देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करणे माहीत होते, परंतु पूजन माहीत नव्हते. ऋग्वेदात कुठेही ‘पूजा’ हा शब्द आढळत नाही. ‘पूजा’ हा शब्द ‘द्राविड’ आहे. द्राविड भाषेत ‘पू’चा अर्थ ‘फूल’ असा आहे. महाभारतकाळी यज्ञाबरोबर पूजा प्रकाराला प्रतिष्ठा होती. ‘भगवद्गीते’त भगवान श्रीकृष्ण म्हणतात “मी सर्व यज्ञांचा भोक्ता तर आहेच, पण त्याबरोबरच पत्र, पुष्प, फल, तोय हे पूजोपचारही मला आवडतात. यापेक्षा मनोभावे नमस्कारही मला प्रिय आहे. पुराणातही पूजेचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. यज्ञयागापेक्षा पूजा करणे सुलभ असल्याने पूजा करण्याचा प्रकार रूढ झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तींना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञयाग सुरू झाले. नंतर मात्र मूर्तिपूजा सुलभ असल्याने ती जास्त लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. गुरू, आचार्य, अतिथी, संत, महात्मे, आई, वडील इत्यादी विभूतींचा जो सत्कार किंवा सन्मान केला जातो त्यालाही पूजा असेच म्हणतात. निसर्गपूजा, वृक्षपूजा, पर्वतपूजा, नदीपूजा, सूर्यपूजा, नागपूजा, गोमातापूजा, अश्वपूजा, वृषभपूजा आणि भूमिपूजाही करण्याची प्रथा आहे. निसर्गाविषयी आदर व्यक्त करणे यालाही पूजाच म्हणतात. बाह्यपूजेपेक्षा मानसपूजा अधिक प्रिय व श्रेष्ठ आहे असेही विद्वानांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोजचे प्राप्त कर्तव्य निष्काम बुद्धीने करीत राहणे ही खरी पूजा आहे असेही भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. इतरांना त्रास देणे हे पाप आणि इतरांना त्रास न देता मदत करणे हे पुण्य असे महर्षी व्यास आणि संत तुकाराम यांनी सांगितलेले आहे. प्रत्येक माणूस हा आयुष्यभर माणसासारखा जरी वागला तरीही ती एक मोठी ईश्वरपूजाच होईल.

आपली प्रतिक्रिया द्या