‘गोविंदा काका’ आणि गोविंदा एकत्र नाचणार? ‘या’ शोमध्ये भेटण्याची शक्यता

44

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या भन्नाट डान्समुळे इंटरनेटवर सुपरडुपर हिट ठरलेले ‘गोविंदा काका’ म्हणजेच मध्यप्रदेशातील संजीव श्रीवास्तव यांना बॉलिवूड स्टार गोविंदा यांच्यासोबत नाचण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या शोमध्ये दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. तशी भेट झाल्यास ते दोघे एकत्र ‘आपके आजानेसे या गाण्यावर’ नाचतील असे सांगण्यात येत आहे.

संजीव श्रीवास्तव यांनी गोविंदाच्या गाण्यावर एका खासगी कार्यक्रमात धम्माल परफॉरमन्स दिला होता. काही दिवसातच त्यांचा हा डान्स इंटरनेटवर व्हायरल झाला. मग काय गोविंदा काका सुपरहीट झाले. त्यांना जाहिरातीच्या ऑफर्स आल्या, विविध टीव्ही शोसाठी त्यांना आमंत्रणं आली. सलमानच्या ‘दस का दम’मध्ये हजेरी लावणारे गोविंदा काका आता माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने’मध्येही दिसणार आहेत. याचवेळी स्टार गोविंदा देखील स्पेशल गेस्ट म्हणून तेथे उपस्थित असणार अशी माहिती मिळते. सेटवर त्यांची थेट गोविंदाशी भेट होणार असल्याची चर्चा आहे.

माधुरी दीक्षित यांच्या शोमध्ये मला बोलवण्यात आलं ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या शोमध्ये गोविंदा येणार आहेत का याची अधिकृत माहिती मला अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र ज्यांच्यामुळे मला इथपर्यंत येण्याचं भाग्य लाभलं त्यांना भेटायची संधी मिळणं हाच माझ्यासाठी पुरस्कार असेल, अशा भावना गोविंदाकाकांनी व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या