चाळीसगाव येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

18

सामना ऑनलाईन । चाळीसगाव

चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील आदर्शनगर भागातील भरवस्तीत असलेल्या घरांवर गुरुवारी पहाटे दरोडेखोरांनी जबरी दरोडा घातला. पती-पत्नीने दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.  मात्र दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांना धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

आज गुरुवारी सकाळी घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीसांच्या श्वानाने हिरापूर रोडवरील नविन नाक्यापुढे स्वामी समर्थ अपार्टमेंट नजिकच्या हनुमान मंदिरापर्यंत चोरट्यांचा माग काढला.

दगडू दौलत देवरे (६०) व जिजाबाई दगडू देवरे (५५) रा. हिरापूर रोड हे दोघे आदर्शनगर येथील आपल्या घरात झोपलेले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दारोडेखोर्‍यांनी टॉमीच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी तरी घुसल्याचे समजताच पती-पत्नीला जाग आली. त्यांनी दरोडेखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला.

यानंतर घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी या दोघांनाही जबर मारहाण केली. दरोडेखोरांनी लाकडाचा दांडा जिजाबाई यांच्या डोक्यावर मारला. त्यामुळे जबर दुखापत होत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या मारहाणीत पती दगडू देवरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिस आधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, उपविभागीय पोलीस आधिकारी अरविंद देवरे, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यानी घटनास्थळी भेट देत पुढील तपासाबाबत धिकार्‍यांनी सूचना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या