दादरला विसरलेला मोबाईल त्याच लोकलने‌ सीएसटीहून रिर्टन आला! टीसींच्या मदतीने प्रवाशाचा जीव भांड्यात पडला

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर कार्यरत टीसींनी एका तरुणाने लोकलमध्ये विसरलेला मोबाईल फोन आणि कागदपत्रे त्याला सहिसलामत परत केली आहेत. विशेष म्हणजे ही बॅग सीएस‌एमटीला जाऊन पुन्हा दादरला आली, तरी बॅग जागच्या जागी तशीच होती, टीसींनी फोनाफोनी करून जलद हालचाल केल्याने या तरूणाची बॅग त्याला सुखरूप मिळाली.

दादर रेल्वे स्थानकात मुख्य तिकट निरीक्षक बागेश्री खोपडे गुरुवारी सकाळी आपल्या ड्यूटीवर असताना एक प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत आला आणि त्याने आपले सामान फास्ट लोकलमध्ये विसरल्याचे सांगितले. लोकल सीएस‌एमटी दिशेने निघून गेली असल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. बॅगेत त्याचा महागडा मोबाईल आणि महत्वाचे सामान असल्याचे त्याने सांगितले. मुख्य तिकट निरीक्षक बागेश्री यांनी त्यांना धीर देत बसायला सांगितले. प्रवाशाने त्यांचे नाव वत्स मजेठिया असे सांगितले. त्यांनी मुलुंड ते दादर असा प्रवास केला होता. ट्रेनमधून उतरण्याच्या गड़बड़ीत ते आपली बॅग घेण्यास विसरुन गेले. त्यांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा लोकल ट्रेन सीएस‌एमटीच्या दिशेने निघून गेली होती.

सर्व माहिती घेतल्यानंतर मुख्य तिकट निरीक्षक बागेश्री यांनी ट्रेनचे लोकेशन शोधून काढले, त्यांना कळले की ट्रेन सीएस‌एमटीहून पुन्हा डाऊन दिशेने निघून गेली होती आणि भायखळ्याच्या ‌पुढे गेली होती. काही वेळाने ही ट्रेन दादरला पोहचणार होती. त्यांनी आपल्या सहकारी जूनियर टीसी मीनल गायकवाड यांना प्रवाशांसोबत प्लॅटफार्मवर जाऊन त्याच लोकलच्या डब्यात जाऊन पाहण्यास सांगितले. जेव्हा ट्रेन प्लॅटफार्मवर आली तेव्हा जूनियर टीसी मीनल गायकवाड यांनी डब्यात जाऊन पाहणी केली तर बॅग प्रवासी बसला होता तिथेच त्याने ठेवलेल्या जागीच रॅकवर सहीसलामत होती. ती बॅग उघडली असता मोबाइल आणि कागदपत्रे सर्व काही जागच्या जागी असल्याचे पाहून त्यांना विश्वासच बसेना. ते आनंदीत झाले आणि त्यांनी टीसींचे आणि मध्य रेल्वेचे आभार मानले. मुख्य तिकट निरीक्षक बागेश्री खोपडे यांची तत्परता तसेच जूनियर टीसी मीनल गायकवाड यांच्या सहकार्याने बॅग, महत्वपूर्ण सामान, मोबाइल सर्वकाही प्रवाशाला सहीसलामत परत मिळाले.