‘झोपडी’ झाली ९० वर्षांची :‘दापाझो’चे आज ९१ व्या वर्षात पदार्पण

58

देशातला राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला क्रिकेट क्लब

मुंबई – गेली ९० वर्षे क्रिकेटची सेवा करताना अन्य सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱया आणि गोरगरीब क्रिकेटपटूंना ४० वर्षे मोफत प्रशिक्षणासह विनाशूल्क क्रिकेट कीट पुरवणाऱया दादर पारसी झोरीस्ट्रीयन/म्हणजेच झोपडी क्रिकेट क्लब उद्या शनिवारी आपली नव्वदी पूर्ण करीत ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. क्रिकेट प्रशिक्षणापासून ते थेट मैदान बचाव आंदोलनाचे नेतृत्व करणारे क्रिकेट संघटक मंगेश भालेकर सध्या ‘दापाझो’चे कार्य अव्याहतपणे पुढे नेत आहेत. गेल्या वर्षी क्लबच्या क्रीडा, शैक्षणिक व सेवाभावी कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार’ देऊन दापाझोचा गौरव केला आहे. प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळविणारा ‘दापाझो’ देशातील पहिला क्रिकेट क्लब ठरलाय.

माटुंग्याच्या मेजर रमेश दडकर मैदानात जहांगीर पिठावाला (मासा शेठ) यांनी १४ जानेवारी १९२६ रोजी स्थापन केलेल्या दापाझोने आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील क्रिकेट क्षेत्रात आपल्या नावाचा मोठा दबदबा निर्माण केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेत या क्लबचा सिंहाचा वाटा आहे. सरचिटणीस मंगेश भालेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली ४० वर्षे क्रिकेटसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबवत सर्वार्थाने ‘आदर्श क्लब’ अशी ‘उपाधी’ दापाझोने मिळविली आहे. खेळ खेळता खेळता समाजासाठी चांगला माणूस बना’ हे ब्रीद डोळय़ांपुढे ठेवून ‘झोपडी’ची यशदायी वाटचाल पुढे सुरू आहे. मासाशेठ यांनी लावलेल्या रोपटय़ाचा आज मोठा वटवृक्ष झालाय. त्यांची निगा मंगेश भालेकर व त्यांचे सहकारी निरपेक्ष वृत्तीने घेत आहेत.

आदर्श उपक्रमांची गंगोत्री

रमेश दडकर मैदानावर माधव मंत्री, नरेन ताम्हाणे, फारुख इंजिनीयर, सुनील गावसकर, रामनाथ पाटकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित आणि लालचंद राजपूतसारखे कसोटीपटू आणि अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते घडविणाऱया दापाझोने (झोपडी) आदर्श उपक्रमांची गंगोत्री बनून मुंबईकरांची स्तुत्य अशी सेवा केलीय. यातील काही प्रमुख उपक्रम असे आहेत.

सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेचे (२६ वर्षांखालील) पुनरुजीवन

कल्पेश कोळी (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकाला सहकार्य.

एमसीएच्या मदतीने शालिनी भालेकर (२३ वर्षांखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ४० वर्षे मोफत क्रिकेट प्रशिक्षण.

मुंबईतील मैदानाच्या बचावासाठी आयोजित चळवळीत पुढाकार.

गरीब मुलांसाठी हेमंत नायगणकर अभ्यासिका.

शिशू विहार शाळा व पोद्दार, रूईयाच्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क नेट सराव.

‘चांदीप’ गावातील आदिवासी व गावकऱयांना निमिती युथ फाऊंडेशनतर्फे वैद्यकीय सुविधा.

दडकर मैदानावर विद्युत रोषणाईसाठी पाठपुरावा.

 

आपली प्रतिक्रिया द्या