
बेस्टच्या ताफ्यातील भरधाव खासगी बसने पादचाऱ्यांसह चार गाड्यांना जोरदार धडक दिल्याचा भीषण अपघात सोमवारी सकाळी दादर-पश्चिमेकडील प्लाझा सिनेमाजवळ घडला. ओलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रीक बसने दोन दुचाकी, एक टॅक्सी आणि एका खासगी कारला फरफटत नेले. त्यात 28 वर्षीय दुचाकीस्वार स्विगी बॉयचा चिरडून मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघाताने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसेसची देखभाल तसेच कंत्राटदारांच्या चालकांच्या बेफिकिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धारावीतील काळाकिल्ला आगाराच्या बस मार्ग क्र. 463वर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसला सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस वीर कोतवाल उद्यान येथून धारावी आगाराच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि थरारक प्रसंग उद्भवला. बस थांबत नसल्याचे लक्षात येताच चालकाने बस धारावीच्या दिशेने न नेता वीर कोतवाल उद्यानाशेजारील चढावाच्या दिशेने वळवली. तेथील दोन दुचाकींसह एक टॅक्सी आणि खासगी कारला भरधाव बसची जोरदार धडक बसली. पुढे त्याच वेगाने बस गेली आणि प्लाझा सिनेमाजवळील पोकलेनला जाऊन आदळली. अपघातात सात जण जखमी झाले. जखमींना तत्काळ शीव रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापैकी नियाझ अहमद (28) या स्विगी बॉयचा मृत्यू झाला. बेस्टच्या ताफ्यातील खासगी बसगाड्यांना अलीकडच्या काही महिन्यांत वारंवार अपघात घडत आहेत. त्यात निष्पाप पादचारी, प्रवाशांचे हकनाक बळी जात आहेत. या वाढत्या अपघातांच्या घटनांनी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमींची नावे
अपघातात दुचाकीस्वार रिषभ गुप्ता (28), पादचारी अमित म्हात्रे (41), बस वाहक राजेंद्र पेलेकर (57), बेस्ट निरीक्षक सतीश वाघमारे (48) आणि महेश डोईफोडे (50) हे जखमी झाले.
चौकशीसाठी चार सदस्यीय समिती
विकास पाडावे हा ओलेक्ट्रा कंपनीसाठी काम करत होता. त्याला मार्च 2021पासून बेस्ट बस चालवण्याचा अनुभव आहे. त्याने बसवरील नियंत्रण सुटले असताना हॅण्ड ब्रेक खेचला होता, असे सांगण्यात आले. बस चालवताना त्याची चूक झाली वा त्याने बेदरकार ड्रायव्हिंग केली का याचा अधिक तपास शिवाजी पार्क पोलीस करीत आहेत. तसेच बेस्ट प्रशासन पातळीवरही अपघाताच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
कुर्ला, भांडुपपाठोपाठ दादरमध्ये जीवघेणा थरार
डिसेंबर 2024मध्ये कुर्ला येथे भरधाव बसच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर डिसेंबरमध्ये भांडुपमध्ये झालेल्या बस अपघातात 13 जण जखमी झाले तर 4 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
मृताच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत!
अपघाताप्रकरणी समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट भवनमध्ये खासगी कंत्राटदार कंपन्यांची बैठक बोलावून मृताला दोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. जखमींना मात्र मदतीची घोषणा करण्यात आली नाही.





























































