मुलं चोरणार्‍याला अटक; दादर रेल्वे पोलिसांची कामगिरी

सामना प्रतिनिधी । मुंबई

नायर रुग्णालयातून मूल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे माहीम येथून दोन महिन्यांचे मूल चोरणार्‍याला अवघ्या काही तासांत दादर रेल्वे पोलिसांनी गजाआड केले. शहाबाज बक्षी शेख असे त्याचे नाव आहे. त्याने 25 हजार रुपयांसाठी मूल चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. शेखला पुढील तपासकरिता माहीम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तक्रारदार महिला या माहीम येथील फुटपाथवर राहतात. मंगळवारी रात्री त्या पती आणि दोन जुळ्या मुलांसह झोपल्या होत्या. तेव्हा दोन महिन्यांचा मुलगा जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर दादर रेल्वे पोलिसांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली. त्यानंतर शहाबाजला दादरमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. अवघ्या अर्ध्या तासात त्या मुलाला शोधून काढल्याचे दादर रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.