तापमानवाढीस जनताच जबाबदार

>>दादासाहेब येंधे<<

dyendhe@rediffmail.com

मुंबईत सध्या तापमानवाढीचा फटका नागरिकांना बसत आहे. आपल्याच बेजबाबदार वागण्यामुळे आपण आजच्या वाढत्या तापमानाचे बदल झेलतो आहोत. आपल्या स्वार्थासाठी आपण झाडे तोडली. झाडे नष्ट झाल्यामुळे दोन गोष्टी होतात. दिवसा वातावरणातील कार्बन डायऑक्साइड झाडे शोषून घेतात, परंतु झाडेच कमी झाल्याने हे प्रमाण कमी होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, हवा शुद्ध राहते. यातही घट झाली. काही वर्षांपूर्वीपर्यंत दर पाच माणासांमागे एक झाड होते, परंतु आता दर ५० माणसांमागे १ झाड असे प्रमाण झालेय. हे व्यस्त प्रमाणच वाढत्या तापमानाचे कारण आहे. त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे व ती जगविणे महत्त्वाचे आहे. आता शहरात झाडेच फार उरली नाहीत. मुंबईत हिरवाई कमी होतेय याला आपणच जबाबदार आहोत. शहरांचे क्राँक्रिटीकरण झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. मैदानं, हिरवळ कमी झाली. यामुळेही तापमान वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे सिमेंट दिवसभर उष्णता शोषून घेतं आणि रात्री हीच उष्णता वातावरणात सोडतं. त्यामुळे दिवसरात्र तापमान कमी होत नाही. अशा पद्धतीने पुन्हा आपल्याच चुकांमुळे आपणच या वातावरणाचे तापमान वाढवतोय असे वाटते. खरे तर बऱ्याच महानगरपालिकांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केलं आहे. तरीही किती सोसायटय़ा, लोक याचा गंभीरपणे विचार करतात? तसेच किती जण आपणहून झाडे लावतात किंवा जी झाडे आहेत त्यांची काळजी घेतात?

शहरातील हिरवाई नष्ट होत चालली आहे, हे खरे आहे आणि या गोष्टीचा आपण सर्वांनीच गंभीरतेने विचार केला पाहिजे. उंच इमारतींची संख्या वाढते आहे. शहरांचा विकास होत आहे, ही अतिशय चांगली बाब आहे, पण झाडांच्या संख्येतही घट होते आहे. उंच इमारती बांधण्यात येतात तेव्हा त्या इमारती बांधणाऱ्यांनी एक झाड तोडल्यास आणखी चार झाडं लावावीत असा नियम आहे. परंतु तसे होत नाही.

मुंबईतील जागेची कमतरता पाहता घरांसाठी पुनर्निर्माण केले जाते, पुनर्रचना केल्या जातात. पण हे सर्व करताना पूर्वीसारखी मोकळी जागा दोन इमारतींमध्ये किंवा घरांमध्ये सोडली जात नाही. पूर्वी दोन इमारती किंवा बैठय़ा घरांमध्ये पुरेशी मोकळी जागा असायची. या मोकळ्या जागेत झाडे तर असायचीच शिवाय तिथं काही कार्यक्रमही व्हायचे. ही जागा मुद्दामहून सोडली जायची. आता लोकसंख्याच एवढी वाढली आहे की, जास्त घरे सामावण्यासाठी छोटे छोटे अनेक प्लॉट्स करावे लागतात. घरांची संख्या वाढवावी लागते. त्यामुळे घरांमध्ये मोकळी जागा ठेवणे अशक्य झाले आहे. स्वतः मुंबई महानगरपालिकेकडे आरक्षित मोकळ्या जागा आहेत, त्याही मोकळ्या असतात पण तिथं झाडे लावली जात नाहीत. इतकेच नाही तर नव्या इमारती बांधताना बिल्डर्सना झाडे लावण्याचा आग्रह होत नाही. आता इतके रस्ते, इमारती वाढल्या आहेत त्यामुळे भवताली काँक्रीटचे प्रमाण वाढले आहे. या काँक्रीटमध्ये, सिमेंटमध्ये उष्णता शोषली जात नाही. काँक्रीटमधून प्रकाश परावर्तित होतो व उष्णता निर्माण होते. पर्यायाने आपल्याला उष्णता वाढल्याचे जाणवतं. याउलट मातीत, झाडांमध्ये प्रकाश शोषला जातो व उष्णतामान कमी होते. आता गुगल मॅपवर पाहिलं तर लालबाग, परळ, शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह इत्यादी ठिकाणी छोटे हिरवे ठिपके दिसतात, याचा अर्थ तिथे हिरवळ अजून टिकून आहे, पण काही काळातच पुनर्रचनेत ही हिरवळदेखील नष्ट होईल. दोन वास्तूंमध्ये किमान तीन मीटर जागा सोडावी असा नियम असला तरी तोदेखील पुरेसा नाही. तेवढी जागा झाडे वाढवण्यासाठी पुरेशी नाही. शिवाय झाडे लावली तरीही त्यांची देखरेख ठेवली जात नाही. आता फक्त निवासी जागा व रस्ते वाढत आहेत, म्हणजेच प्रकाश बाहेर सोडून उष्णता निर्माण करणारे पृष्ठभाग वाढत आहेत. मुंबईतले वाढलेले तापमान त्याचेच फळ आहे.

तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण आहे, अनिर्बंध वाढत जाणारे शहरीकरण आणि कमी होणारी वृक्षांची संख्या. एखादे शहर कितपत वाढवले पाहिजे याचे निकष पाळणे गरजेचे आहे. मुंबईतही नॅशनल पार्क, कलिनासारखे भाग वगळता अशी फार कमी ठिकाणे राहिली आहेत जिथे जुनी झाडे शिल्लक आहेत. झाडे जुनी असल्यामुळे त्याचा विस्तार तितका मोठा असतो आणि त्यामुळे तितक्याच जास्त प्रमाणात ऑक्सिजन पुरवठाही होतो आणि हवाही मिळते. पण शहरीकरण करत असताना, जांभूळ, वड, औदुंबरसारखी झाडे त्यांच्या मोठय़ा विस्तारामुळेच तोडली जातात. ही सगळी कारणे तापमानवाढीस जबाबदार आहेत. एखाद्या ठिकाणी इमारत बांधताना, पुनर्विकासाच्या वेळी तिथल्या झाडांचा विचार केला जातो का? किंवा ती झाडे तोडलीच तर त्याऐवजी नवीन झाडे तरी लावली जातात का? कित्येक ठिकाणी नवीन झाडे लावण्याचा दावा केला जातो आणि त्या ठिकाणी ती झाडे लावलीही जातात पण त्या झाडांची कितपत काळजी घेतली जाते? दुसऱ्याच वर्षी त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यास ती झाडे नाहीशी झालेली दिसतात. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगविले पाहिजे. हिरवळीचे प्रमाण मुंबईत वाढविले पाहिजे.