डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांनी खुर्ची घरी नेली, नरपडच्या ग्रामसेवकाने पंचायतीचा एसी पळवला!

975

सत्तेच्या खुर्चीचा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही, असे नेहमी म्हटले जाते. पण आता प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही तिला सोडून जाता येत नसल्याचा अजब-गजब प्रकार समोर आला आहे. डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार द्वासे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी कंत्राटदाराने भेट दिलेली खुर्ची घरी नेली आहे. त्यामुळे नवीन आलेल्या मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन खुर्ची विकत घेण्याची वेळ प्रशासनावर आली.

डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजयकुमार द्वासे यांनी 11 मे रोजी पदभार सोडला. मात्र नवीन जागी रुजू होण्याआधी त्यांनी कार्यालयातील आपली खुर्ची देखील घरी नेली. त्यामुळे नव्या मुख्याधिकाऱ्यांना नवी खुर्ची मागवावी लागली आहे. एका कंत्राटदाराने ही खुर्ची दुवासे यांना भेट दिली होती, असे बोलले जात आहे. त्यामुळे या लकी खुर्चीचा मोह द्वासे यांना सोडवता आला नसावा, अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे. द्वासे यांची मुख्याधिकारी म्हणून डहाणू नगर परिषदेतील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांच्या कार्यकाळात कामे न करता बिले काढणे, एकाच कामाची अनेक वेळा बिले काढणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या भेट दिलेल्या खुर्ची मागचे गौडबंगाल काय याची चर्चा करत होत आहे.

नरपडच्या ग्रामसेवकाने पंचायतीचा एसी पळवला
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पदभार काढून घेतलेल्या ग्रामसेवकांना चक्क पंचायत कार्यालयात बसवलेला एसी पळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील नरपड गावात घडलेल्या या हेराफेरीचा भांडाफोड होताच या ग्रामसेवकांना हा एसी माझ्या मालकीचा असल्याचे सांगत गावकऱ्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संतापलेल्या नरपड वासियांनी चौकशीची मागणी केली आहे. विरारच्या महावीर इंडस्ट्रीजने नरपड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एअर कंडिशनर बसवून दिला होता. या एसीवर सप्रेम भेट असे लिहिले आहे. नरपड ग्रामपंचायतीच्या मनोज इंगळे या नगरसेवकाकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. त्याच्याकडे चिखले आणि आशागड ग्रामपंचायतीचाही पदभार होता. मात्र नरपड ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळाल्यानंतरही इंगळे पदाचा पदभार सोडत नव्हते. इंगळेंच्या विरोधात ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यानंतर अचानक इंगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन तेथील एअर कंडिशनर स्वतःच्या मालकीचा असल्याचा दावा करत काढून नेला. त्यामुळे कोणत्या प्रकरणात इंगळे यांना भेट देण्यात आला होता, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी, अशी मागणी नरपड येथील ग्रामस्थ सचिन राऊत यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या