थर आणि थरार मोकळा!

129

गेल्या वर्षीचे निराशेचे मळभ यंदाच्या दहीहंडी उत्सवावर दिसणार नाही. ‘बोल बजरंग बली की जय’चा गजर पूर्वीच्याच उत्साहात मुंबईसह महाराष्ट्रात घुमेल. दहीहंडीसाठी एकावर एक रचले जाणारे गोविंदाचे थर, त्यांचे अधूनमधून कोसळणे, पुन्हा थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणे हा एक थरारक आणि चैतन्यदायी अनुभव असतो. न्यायालयाचा निर्णय ‘अटी व शर्ती लागू’ असा असला तरी दहीहंडीचे थर आणि त्यांचा थरार मोकळा करणारा म्हणावा लागेल.

दहीहंडीचे थर आणि थरार यांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंधांचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे. त्यामुळे थरांची ‘कोंडी’ फुटल्यात जमा आहे. दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर २० फुटांच्या बंधनाचे संकट कायम होते. मात्र ही उंची किती असावी याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी भूमिका घेत उच्च न्यायालयानेच हे संकट दूर केले हे चांगलेच झाले. आता गोविंदांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी असता कामा नये अशी ‘बंदी’ न्यायालयाने घातली असली तरी दहीहंडीच्या लांबीरुंदीची अकारण निर्माण झालेली अनिश्चितता संपली. गोविंदांच्या उत्साहावर पडलेले विरजण दूर झाले आणि दहीहंडी उत्सवाला नेहमीप्रमाणे उत्साहाचे उधाण येण्याचा मार्ग मोकळा झाला हे शेवटी महत्त्वाचे. न्यायालयाने वयोमर्यादेबाबत जी भूमिका घेतली आहे त्यामागे सुरक्षेची भावना आहे. तिचा आदर केला तरी दहीहंडी हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. मानवी मनोरे रचण्याचा थरार करण्यात आणि त्याचा आनंद लुटण्यात एक वेगळीच अनुभूती गोविंदा पथकांना आणि प्रेक्षकांनाही मिळत असते. आता या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरापर्यंत चढणाऱ्या गोविंदाचे वय आणि वजन हा मुद्दा कळीचाच आहे. कारण वयाने लहान गोविंदा वरच्या थरावर यशस्वी चढाई करण्यासाठी योग्य ठरतो, अशी गोविंदा पथकांची भूमिका असते. त्यांचाही तर्क चुकीचा नाही, पण न्यायालयाने आधीची १८ वर्षांची मर्यादा आता १४ वर्षांपर्यंत खाली आणली हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे निराशेचे मळभ यंदाच्या गोपाळकाला उत्सवावर दिसणार नाही. ढाक्कुमाकुमचे ढोल आणि ‘बोल बजरंग बली की जय’चा गजर पूर्वीच्याच उत्साहात मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा जोरात घुमेल. दहीहंडीसाठी एकावर एक रचले जाणारे गोविंदाचे थर, त्यांचे अधूनमधून कोसळणे, त्यातून पुन्हा थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणे हा एक वेगळाच थरारक आणि चैतन्यदायी अनुभव असतो. उच्च न्यायालयाचा निर्णय ‘अटी व शर्ती लागू’ असा असला तरी दहीहंडीचे थर आणि त्यांचा थरार मोकळा करणारा म्हणावा लागेल.

नक्षलबंदीची ठिणगी

गडचिरोलीसारख्या नक्षलवाद्यांचा परंपरागत गड असलेल्या जिल्हय़ात सध्या भलतेच घडत आहे. तेथील सात तालुक्यांतील १४० गावांनी नक्षलवाद्यांविरोधात ‘एल्गार’ पुकारला असून त्यांना कायमची ‘गावबंदी’ केली आहे. धानोरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमधील लोकांनी ही करामत करून दाखवली आहे. या गावांचे धाडस दाद देण्यासारखे तर आहेच, पण नक्षल्यांच्या त्रासाला आणि जाचाला तेथील लोक किती उबगले आहेत हेदेखील या उद्रेकातून दिसून येते. सध्या नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी विविध घटनांत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दुर्गम भागांमध्ये स्मारके उभारली जातात. तेथे श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित करून नक्षलवादाची पाळेमुळे तुटणार नाहीत आणि आपली दहशत कायम राहील याची काळजी नक्षल्यांचे तेथे कार्यरत असलेले गट घेत असतात. मात्र त्यांच्या वर्चस्वालाच १४० गावांच्या ‘नक्षलबंदी’ने धक्का दिला आहे. नक्षल्यांनी उभारलेली काही ‘शहीद स्मारके’देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहेत; तर नक्षलबंदी केलेल्या गावांत नक्षलवाद्यांना ती उभारता आलेली नाहीत. अर्थात, याचा अर्थ नक्षलवादी हार मानतील, त्यांची वळवळ थांबेल असे नाही. किंबहुना ते आपली दहशत पुन्हा निर्माण करण्यासाठी अधिक क्रूर आणि रक्तरंजित हिंसाचार करू शकतील. सुरक्षा यंत्रणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात, हा धोका तर नेहमीचाच आहे, पण महत्त्वाची आहे ती गडचिरोली जिल्हय़ातील १४० गावांनी टाकलेली नक्षलबंदीची ‘ठिणगी.’ तिचा वणवा पेटतो का, कधी व किती पेटतो हे भविष्यातच दिसेल. पण तूर्त तरी या १४० गावांमध्ये नक्षलवाद्यांसाठी ‘आक्रित’ घडले आहे. समाज आणि सरकारने त्या गावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या