मुंबईची लोककला

62

डॉ. गणेश चंदनशिवे, [email protected]

गोविंदा, दहीहंडी… खास महाराष्ट्रातली.. विशेष करून मुंबईची लोककला…

लोकरंगभूमीवर प्रदेश परत्वे कृष्णजन्माष्टमीचा सोहळा मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. उत्तर हिंदुस्थानात फुलांचा वर्षाव करून गौळणी आणि कृष्ण रासलीला खेळताना दिसतात. हीच परंपरा मणिपूर, मिझोरम, प. बंगाल, छत्तिसगडसह महाराष्ट्रातसुद्धा पाहवयास मिळते. दुर्जनाचा संहार करून विजय प्राप्त केल्यानंतर कृष्ण आणि सवंगडी गोपाळकाला खाऊन आनंद व्यक्त करण्याची परंपरा हिंदुस्थानी संस्कृतीत अतिप्राचीन आहे. महाराष्ट्रात बंजारा समाज गोकुळाष्टमीचा सण मोठय़ा थाटामाटात साजरा करतात. हातामध्ये लाठी घेऊन मटकी फोडून त्यातील दही, चुरमुरे मिश्रित केलेले कालारूपी पदार्थ सर्वाना  वाटण्याची परंपरा अनुभवयाला मिळते.

बंजाराप्रमाणेच कोकणातही मोठय़ा प्रमाणात हंडी फोडून गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. कृष्णाच्या नटखट लीला दर्शवण्याचं काम संतांनी गौळणीतून केले. तेच काम शाहिरांनी आपल्या गौळण अर्चनेमध्ये केलेले दिसते. संतांच्या गौळणीत कृष्णाच्या बाललीलांचे दर्शन घडते. तर शाहीरांच्या गौळणीत कृष्णक्रीडेचा अनुभव आपल्याला येतो. सांस्कृतिकदृष्टय़ा कृष्ण जन्माष्टमी जरी गौळणीतून दिसत असेल, तरी गोकुळाष्टमीचा सण गोविंदाच्या रूपाने खेळ म्हणून नावारूपाला आलेला आहे. ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत महाराष्ट्रात गोविंदा पथके ढोलताशाच्या गजरात थरावर थर जोडण्यासाठी गोकुळाष्टमी सणाची आतुरतेने वाट पाहात असतात.

आज जागतिकीकरणाच्या युगात गोविंदाची प्रसिद्धी ही महाराष्ट्रापर्यंत सीमित नसून ती परदेशातील स्पेनपर्यत जाऊन पेचलेली आहे. लोककलेतून निर्माण झालेला हा खेळ आज लाखो रुपयांच्या उलाढालीचा होऊन बसला आहे. मानवी मनोऱयाच्या सहाय्याने पस्तीस ते चाळीस लोकांचा एक समूह एकत्र येऊन गोविंदा पथक निर्माण करतात. ही गोविंदा पथके आधी ढोलताशाच्या गजरामध्ये थरावर थर रचून हंडी फोडत असत आणि कृष्ण जन्माष्टमींचा सण साजरा करत असत, पण कालमानपरत्वे आधुनिक काळात या दहिहंडीला ‘इव्हेन्ट’चे स्वरूप प्राप्त झाले असून त्यातून ‘ग्लॅमर’ निर्माण झाले आहे.

गोविंदा पथकातील सदस्य अंगाने बळकट आणि लवचिक असणे गरजेचे आहे. थर रचताना अपघात होऊन अनेक कलावंत मृत्युमुखी पडल्याचे उदाहरण आपल्याला मागच्या काही काळात पाहवयास मिळतात. त्यामुळे शासनाने गंभीर दखल घेऊन मागील काही काळात थरांवरती निर्बंध आणले आहेत. दहिहंडीचा सण साजरा करताना त्यातून निखळ आनंद मिळालाच पाहिजे, ही मनोकामना मनी बाळगून भगवान श्रीकृष्णाला अभिवादन केले पाहिजे. लोककलेतून निर्माण झालेला हा खेळ आज जागतिक कीर्तीचा होऊन बसलेला आहे. देशपरदेशामध्ये भगवान श्रीकृष्णाला लोक गाऊन, नाचून आणि हंडी फोडून अभिवादन करत आहेत. सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन मोठय़ा थाटामाटात दहिहंडीचा सण साजरा करावा, हीच मनोकामना!

 

आपली प्रतिक्रिया द्या