
कश्मीरमध्ये हाडे गोठवणारी थंडी, पारा उणे 18 डीग्री सेल्सियसवर
जम्मू-कश्मीरच्या जोजिला येथे आज पारा तब्बल उणे 18 डीग्री सेल्सियसवर पोहोचला. आज रात्री पारा उणे 25 डीग्री सेल्सियस आणि सोमवारी उणे 29 डीग्री सेल्सियसपर्यंत घसरू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री उणे 0.5 डीग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. पुढचे दोन दिवस येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये गुलमर्ग, माछिल सेक्टर, कुपवाडा, पीर की गली येथे जोरदार बर्फवृष्टी सुरू असून शोपिया आणि पुंछला जोडणारा मुघल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रशिया-युक्रेनमध्ये चर्चा घडवणार – जयशंकर
रशिया-युक्रेन युद्ध, भूमध्य समुद्र आणि जगभरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण याबाबत हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कतारमध्ये आयोजित दोहा फोरममध्ये देशाच्या वतीने मते मांडली. रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा घडवून आणू असे ते म्हणाले. आता काळाची सुई युद्धाऐवजी संवादाकडे सरकत आहे. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढय़ा किमतींचा सामना करावा लागत आहे, असे जयशंकर म्हणाले.
राहुल गांधी यांनी मुलींना शिकवले कराटेचे डावपेच
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी राजस्थानच्या जयपूर जिह्यातील सामोद येथील खेडापती बालाजी आश्रम येथील काँग्रेसच्या नेतृत्व शिबिरात सहभाग घेतला. यावेळी राहुल गांधी मार्शल आर्टच्या गणवेशात दिसले. त्यांनी लहानग्या मुलींना मार्शल आर्ट आणि कराटेचे डावपेच शिकवले. त्याचबरोबर त्यांच्याशी संवादही साधला. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमच्या वतीने नेतृत्व संगम शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिराच्या माध्यमातून विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसंग्रामाबाबत माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते.
गोरख कर्डिले यांचे निधन
नगर जिह्यातील राजूर गावचे रहिवासी गोरख जगन्नाथ कर्डिले (40) यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी नाशिक जिह्यातील आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 12 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
रेल्वे कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचारी ट्रकवर बसल्याचे पाहून मालगाडीच्या लोको पायलटने त्याची विचारपूस केली. ‘मोठे अधिकारी त्रास द्यायचे. त्यांची वैयक्तिक कामेदेखील करावी लागतात. आजारी असूनही सुट्टी मिळत नाही,’ अशा शब्दांत पीडित कर्मचारी हरविंदरने तक्रारींचा पाढा वाचला.
पोलिसांचे कौतुक केले, पतीने दिला तिहेरी तलाक
उत्तर प्रदेशातील संभल येथे एका महिलेने हिंसाचारानंतर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले असता तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला. पीडित महिलेने मुरादाबाद पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ही महिला हिंसाचाराचा व्हिडीओ पाहत होती. तेव्हा तिने संभल पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत हिंसाचारावर भाष्य केले. यावरून संतापलेल्या पतीने थेट तिहेरी तलाक दिला.
‘पुष्पा’ची बॉक्स ऑफिसवर फायर
5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा-2ः द रुल’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 205 कोटींची कमाई करून शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि रणवीर कपूरच्या ‘ऑनिमल’ या चित्रपटाचा विक्रम मोडला. आता हा हिंदी चित्रपट तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सहा भाषांमध्ये हा चित्रपट असून त्याने तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानात 387.95 कोटी रुपये आणि जगभरात 598.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यापारतज्ञ तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे विश्लेषण केले. याआधी ‘जवान’ने तीन दिवसांत 180 कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला होता.