गुरू ग्रहाच्या ‘रेड स्पॉट’मध्ये होतेय हालचाल शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान
नासाच्या यानाला ‘गुरू’वर पृथ्वीपेक्षा मोठा ‘लाल डाग’ दिसला आहे. ग्रेट रेड स्पॉट (जीआरएस) असे या भागाला म्हणतात. रेड स्पॉटच्या रंगात, आकारात महत्त्वपूर्ण बदल होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. नासा शास्त्रज्ञांनी हबल टेलिस्कोपच्या मदतीने जीआरएसच्या हालचालींचा अभ्यास केला आहे. गुरू ग्रहावरील रेड स्पॉट एखाद्या जिलेटिनच्या वाडग्यासारखा हलत असल्याचे दिसून आलेय. हबल टेलिस्कोपच्या डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत ही निरीक्षणे टिपण्यात आली आहेत. या अद्वितीय निरीक्षणांमुळे आतापर्यंतच्या समजुतींना छेद गेला आहे. सौरमालेतील सर्वात मोठ्या वादळाच्या हालचालींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सहारा वाळवंटात 50 वर्षांनी आला पूर
उत्तर आफ्रिकेतील मोरक्को येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात तब्बल 50 वर्षांनी पहिल्यांदा पूर आला आहे. सहारा वाळवंट प्रत्यक्षात अत्यंत रखरखीत आहे. दूरदूरपर्यंत पाणी दिसत नाही. मात्र, आता निसर्गाचा लहरीपणा वाढला असून गेल्या 24 तासांत या वाळवंटात सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे हे वाळवंट पाण्याखाली गेले आहे. असामान्य वादळाचा परिणाम म्हणून सहारा वाळवंटात तुफान पाऊस झाल्याचे हवामानतज्ञांनी म्हटले आहे. गेल्या 30 ते 50 वर्षांत इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचे मोरक्कोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ई-मेलवर जॉब ऑफर लेटर मिळणार नाही
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने नोकरभरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. नव्या कर्मचाऱ्यांना कंपनी ई-मेलवर ऑफर लेटर किंवा अटॅचमेंट पाठवणार नाही. नव्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन लेटर किंवा अन्य डॉक्युमेंट्स घ्यावे लागतील किंवा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लॉग इन करून डाऊनलोड करावे लागेल. यामुळे भरती प्रक्रियेतील ‘फ्रॉड’ रोखण्यास मदत होईल. तसेच उमेदवारांना उत्तम, पारदर्शक भरती प्रक्रियेचा अनुभव मिळेल. कंपनीचा कारभार पेपरलेस होण्यासही मदत होईल. उमेदवारांना फसवेगिरीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय कंपनीने घेतला आहे. इन्फोसिसच्या व्यवस्थापनाने नव्या निर्णयाबद्दल नोटिफिकेशन जारी केले आहे.
भल्याभल्यांची झोप उडाली!
मानसिक आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबर 2022 मध्ये ‘टेलिमानस’ ही फ्री हेल्पलाईन सेवा सुरू केली. या हेल्पलाईनचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आतापर्यंत ‘टेलिमानस’वर देशभरातून 3.5 लाखांहून अधिक कॉल आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कॉल झोपेच्या तक्रारीसंदर्भात होते. ‘टेलिमानस’चा नवा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध झाला. या हेल्पलाईनवर कोणत्या तक्रारी सर्वाधिक आल्या, त्याचे विश्लेषण या अहवालात आहे. त्यानुसार पुरेशी झोप न येण्याच्या 14 टक्के तक्रारी आहेत. उदास, नैराश्याचे प्रमाण 14 टक्के, तणाव 11 टक्के आणि चिंता-काळजीच्या 9 टक्के तक्रारी आहेत. आत्महत्या प्रकरणांशी संबंधित 3 टक्के तक्रारी आढळून आल्या. ‘टेलिमानस’वर पुरुषांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण 56 टक्के इतके आढळून आलेय.
पोस्टातून दिवाळीचा फराळ पाठवा विदेशात
नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या व्यक्तींना दिवाळीचा फराळ वेळेवर मिळावा, यासाठी पोस्ट खात्याने सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट खात्याने मुंबईत ही सुविधा सुरू केली आहे. मुंबईतील सर्व कार्यालयांमध्ये फराळाच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्येच फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग केले जाते. हे बॉक्स लगेच परदेशात पाठवले जातात. या सेवेचा लाभ अधिकाधिक मुंबईकरांनी घ्यावा आणि परदेशातील नातेवाईकांना फराळ पाठवावा, असे आवाहन पोस्ट खात्याने केले आहे.
यूजीसीने तयार केला मास्टर प्लॅन, शिकतानाच नोकरी अन् वेतन
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार आहे. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. याद्वारे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना तीन किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंडस्ट्री बेस्ड ट्रेनिंगसह स्टायपेंड दिले जाईल. त्यामुळे पदवीधरांना व्यावहारिक उद्योगांचा अनुभव देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढवता येईल. हा अभ्यासक्रम जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासून सुरू केला जाऊ शकतो. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, अप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम मंजूर झाला आहे.
150 दहशतवादी कश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत
हिवाळ्यात जवळपास 150 दहशतवादी नियंत्रण रेषेवरून कश्मीर खोऱ्यात घुसण्याच्या तयारीत आहेत, असा दावा सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज केला. त्याचबरोबर हिंदुस्थानी लष्करही त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असून ही घुसखोरी मोडून काढण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कश्मीरमध्ये सातत्याने घुसखोरी सुरूच आहे. विविध तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराशी समन्वय साधून घुसखोरी मोडून काढण्यासाठी कृती आराखडा आखण्यात येत असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी श्रीनगरमध्ये वार्ताहारांशी बोलताना सांगितले.
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब
जर्मनीच्या हॅम्बर्ग प्रांतात दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला आहे. हा बॉम्ब सापडल्यानंतर त्याच्या 300 मीटरच्या परिघात राहणाऱ्या जवळपास पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यानंतर या परिसरातील सर्व हॉटेल्स आणि बारही बंद करण्यात आले. एका प्राथमिक शाळेच्या बांधकामादरम्यान हा बॉम्ब सापडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बॉम्ब अतिशय सुरक्षितरित्या निकामी करण्यात आला. त्यासाठी जवळपास अर्ध्या तासाचा वेळ लागल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान हा बॉम्ब सापडल्यानंतर रेल्वे सेवादेखील रोखून धरावी लागली.
नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला देवीचा मुकुट चोरीला
बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून कालिमातेच्या मूर्तीचा मुकुट चोरीला गेला. मंदिरातील पुजाऱ्यांनी गुरुवारी दुपारी नियमित पूजाविधी केल्यानंतर ही घटना घडली. मंदिरात साफसफाई करणाऱ्याला मुकुट गायब झाल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2021 मध्ये बांगलादेश भेटीत हा सोन्या-चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला होता. यासंदर्भात ढाका येथील हिंदुस्थानी उच्चायुक्त स्थानिक प्रशासनाच्या संपका&त आहेत. याप्रकरणी तपास करून मुकुट परत मिळवावा आणि गुन्हेगारांना अटक करावी, असे ट्विट हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांनी केले.
तामीळनाडूचा अपघात म्हणजे बालासोर-2
तामीळनाडूतील कावरपेट्टई स्थानकावर मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनची धडक झाल्याप्रकरणी रेल्वेने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्याचवेळी तज्ञांनी या अपघाताला ‘बालासोर-2’ असे संबोधले असून इंटरलॉकिंग प्रक्रियेतील बिघाडामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. इंटरलॉकिंग पॉइंटवर ट्रेन रुळावरून घसरली. इंटरलॉकिंग प्रक्रियेतील ही एक अभियांत्रिकी त्रुटी आहे. जी रेल्वेतील प्रत्येकाला माहीत आहे, परंतु कुणीही अधिकृतपणे कबूल करत नाही, असे उत्तर रेल्वेतील मुख्य सिग्नल आणि कम्युनिकेशन इंजिनीअर या पदावरून निवृत्त झालेले के. पी. आर्या म्हणाले. दरम्यान, बालासोरमध्ये सिग्नल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच ही टक्कर झाली. इथे असे काही घडले नाही. ट्रकला काही गंज लागल्याने सिग्नल आणि इंटरलॉकिंगचे कनेक्शन तुटले असावे, असे इंडियन रेल्वे लोको रनिंगमेन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पांधी म्हणाले.