‘कोरोना व्हायरस’च्याआड चीनची राजकीय चाल? बौद्ध धर्मगुरूंच्या घरावर बंदी

1394
dalai-lama-and-china

तिब्बेटमधील ‘पोटाला पॅलेस’ हे बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थानांपैकी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे हे अधिकृत घर आहे. जगभरातून लाखों भाविक, पर्यटक या सांस्कृतिक ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. अध्यात्मिक शांती, साधनेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मात्र तिब्बेटसोबत झालेल्या युद्धानंतर चीन सरकारने ही जागा बळकावली असून आता ‘कोरोना व्हायरस’च्या नावाखाली हा महाल बंद करण्यात आल्याचे चीनच्या सरकारने जाहीर केले आहे. ‘कोरोना व्हायरस’च्या नावाआड घेण्यात आलेला हा निर्णय राजकीय हेतूने देखील प्रेरित असण्याची चिंता व्यक्त होत आहे.

दलाई लामा यांचे घर ‘पोटाला पॅलेस’ हे अत्यंत पवित्र ठिकाण मानले जाते. असंख्य भाविक इथे अध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी येत असतात. बौद्ध धर्मीयांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र असलेल्या या महालाला बंद करण्याचा निर्णय चीनच्या सरकारने घेतला आहे. आजार पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी किती दिवसांसाठी हा महाल बंद असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. चीनने देशांतर्गत तसेच आंतराष्ट्रीय पर्यटन कंपन्यांनी या ठिकाणचे तिकीट देऊ नयेत असे आदेश दिले आहेत.

‘पोटाला पॅलेस’ला 13 मजले आहेत. यामध्ये 1000 हून अधिक खोल्या आङेत. या महालात दोन लाखांहून अधिक मूर्ती आहेत. चीन आणि तिबेटच्या युद्धात या महालाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. या युद्धानंतर बौद्ध धर्मगुरू दलाई लामा तेनजिन ग्यास्टो हिंदुस्थानमध्ये आले. त्यांना इथे हिंदुस्थानकडून सर्व सुविधा आणि सन्मान देण्यात आला. मात्र तिकडे चीनने तिबेटवर कब्जा केला आणि महाल देखील आपल्या ताब्यात घेतला. 1961 मध्य हे ठिकाण चीनची सांस्कृतिक वास्तू म्हणून जाहीर करण्यात आले. दरम्यान तिबेट-चीनचा संघर्ष सुरूच आहे. यामुळे चीनच्या सरकारने कोरोना व्हायरसच्या नावाखाली ही बंदी आणल्याची शक्यता मानली जात आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून मृतांचा आकडा 80 वर पोहोचला आहे. चीन सरकारकडून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 3000 जण कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. वुहान या शहरातून पसरलेला हा व्हायरस आता शांघाय शहरातही पसरला आहे.

वुहान शहरातील हुबेई या शहरात या व्हायरसचा मोठा प्रभाव असून चीन सरकारने या शहरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. तेथील नागरिकांच्या प्रवासावर बंदी आणली आहे. त्यामुळे कायम गजबजलेले असलेल्या या शहरातील रस्ते सुनसान पडले आहेत. सरकारने दुसऱ्या शहरात जाणाऱ्या बस व रेल्वे सेवाही थांबविल्या आहेत. या शहरात प्राण्यांच्या कत्तली थांबविल्या असून नागरिकांना फक्त भाजीपाला खाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकारने या शहरात 10 दिवसांत 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या