दीड हजार रुपयांचं व्याज दिलं नाही म्हणून दलित महिलेला मारहाण, लघवी प्यायला लावली

बिहारची राजधानी पाटणा येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. येथील एका गावात अवघ्या दीड हजार रुपयांचं व्याज दिलं नाही, म्हणून एका दलित महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या महिलेला लघवी पिण्यासही भाग पाडण्यात आल्याचंही वृत्त आहे.

ही घटना खुसरूपूर प्रखंड तालुक्याच्या मोसिमपूर येथे ही घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, रविवारी रात्री 10 वाजता ती आपल्या घराबाहेर पाणी भरायला गेली होती. तेव्हा पंचायतीतील एका गुंडाने तिच्या नवऱ्याचं अपहरण केल्याचं सांगून तिला आपल्या घरी नेलं. तिथे नेऊन तिला विवस्त्र करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. या दरम्यान महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर तिला लघवी प्यायला भाग पाडलं, असा आरोप तिने केला आहे.

यातून बचावून ती विवस्त्रावस्थेतच घरी धावली. त्यानंतर तिला सातत्याने धमक्या मिळत आहेत. तिने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, तिच्या नवऱ्याने दीड हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचं व्याज दिलं नाही म्हणून त्यांना ही मारहाण करण्यात आली. वास्तविक ते कर्ज फेडण्यात आलं होतं. तरीही हा छळ करण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे.