आजच्या ग्लॅमरच्या दुनियेत नृत्यकलेला करियर म्हणून उत्तम वाव

94

सामना प्रतिनिधी । मुंबई

विविध मानवी हावभावांचे आंगिक प्रदर्शन म्हणजे नृत्य. नृत्य ही एक प्राचीन कला आहे. भरतनाटय़म्, कथकली, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कुटियाट्टम असे नृत्याचे विविध प्रकार देशभरात सादर केले जातात. प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर होते. ही कला म्हणजे लोकांच्या मनोरंजनाचे लोकप्रिय माध्यम आहे. नृत्य करण्याची ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी या कलेत आपलं करियर करण्याची संधी आहे.

नृत्यकलेचे शास्त्रीय आणि लोकनृत्य किंवा फोकडान्स असे दोन भागांत विभाजन करण्यात आले आहे. ही कला शिकताना दोन्ही नृत्यप्रकारांविषयी आवश्यक असलेले समान्य ज्ञान, नृत्याचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली जाते. प्रमाणपत्र कोर्सव्यतिरिक्त डिप्लोमा, पदवी आणि पदविका असे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात गाण्याच्या चालीवर केल्या जाणाऱया नृत्याचे बारकावेही शिकवले जातात. प्रायोगिक ज्ञानाबरोबरच ज्यांच्याकडे पाठय़पुस्तकीय ज्ञान आहे, तेही या क्षेत्रात अनेक मार्गांनी यश मिळवू शकतात.

संधी

नृत्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध कला केंद्र, दूरचित्रवाहिन्या, नृत्य शिक्षक या ठिकाणी रोजगाराची संधी आहे. शिवाय नृत्य संस्था, म्युझिक अल्बम, सिनेमातही करियरचा उत्तम मार्ग आहे. परदेशात हिंदुस्थानी लोकनृत्य कलाकलांसाठी मागणी असते. साल्सा, जैज, रॉक, हिप हाप, बेले असे पाश्चात्त्य नृत्य प्रकार येणाऱयांनाही भरपूर मागणी असते. बरेच जण स्वतःची नृत्य संस्थाही सुरू करू शकतात. आज रिऑलिटी शो हेही नृत्य कलाकाराला स्वतःला सिद्ध करण्याचे एक माध्यम बनले आहे.

नृत्य दिग्दर्शक कसे व्हाल?

नृत्य शिकवणे ही आजच्या तरुणांची आवड आहे. पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याची ही संधी आहे. सिनेमा, नृत्य अकादमी या क्षेत्रात नृत्य दिग्दर्शकाची मागणी असते. सध्या यामध्ये वाढ होत आहे. पण दिग्दर्शन करणे म्हणजे दुसऱयाला घडवणेही असते. नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरियोग्राफी शिकण्यासाठी नृत्य संस्थांमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे.

नृत्य प्रशिक्षण संस्था

  • संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली
  • नाटय़ इन्स्टिटय़ूट ऑफ कथ्थक, बंगलोर
  • स्कूल ऑफ फाईन आर्टस, इंदूर
  • महात्मा गांधी मिशन संगीत अकादमी, औरंगाबाद
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
आपली प्रतिक्रिया द्या