दगड घेऊन जाणाऱ्या उघड्या टिप्परने प्रवाशांचे जीव धोक्यात

सामना प्रतिनिधी । बीड

बीड – परळी मार्गाला समांतर नगर – परळी रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामातील काढलेले दगड इतरत्र हलवतांना उघड्या टिपरमध्ये घेऊन जात आहे. वाहतुकी दरम्यान टिपर मधील उघडे दगड रस्त्यावर कोसळून मोठ्या दुर्घटना होऊ शकतात. या कडे महसूल आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सध्या नगर – परळी या रेल्वे च्या कामाने मोठी गती घेतली आहे. बीड – परळी रस्त्याला समांतर रेल्वेचे काम होत आहे. काही ठिकाणी डोंगर खोदण्याचे काम सुरू आहे. या खोदकामात निघालेले मोठ मोठे दगड इतर कामाला वापरण्यासाठी तेथून दुसरीकडे हलवले जात आहेत. ही वाहतूक उघड्या टिपर मधून केली जात आहे. या टिपर मधून दगड खाली कोसळले तर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना मोठा अपघात होऊन दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. पोखरी, घाटसावली भागातील ग्रामस्थांनी अनेकदा सांगूनही या कडे दुर्लक्ष होत आहे.