दुसऱ्या महायुद्धावर आधारित इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी

इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या डॅनिश  मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते या कथानकावर आधारित चित्रपट  इन टू द डार्कनेस/ De forbandede år  या चित्रपटाने आज समारोप झालेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या या  डॅनिश चित्रपटाने नाझींच्या कब्जात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे.

नायक कार्लस्कोव्हला सामना करावा लागणाऱ्या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. एकीकडे, त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जर्मन बाजारपेठेचे उत्पादन चालू ठेवण्यास आक्रमकांद्वारे भाग पाडले जात आहे तर दुसरीकडे, या निवडीच्या नैतिक अनिश्चिततेमुळे त्याच्या कुटुंबालाही यातना सोसाव्या लागत आहेत.

40 लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. तसेच दोघांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.

तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या  चेन-नियन को यांना त्यांच्या 2020 च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी प्रदर्शन या चित्रपटातून करण्यात आले आहे.

कर्णबधिरांच्या जगातील वास्तविक घटनांवर आधारित 108 मिनिटांच्या या चित्रपटात नुकत्याच एका विशेष शाळेत दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. पीडितांना  सावज बनवून  त्यांचा कसा बळी जातो याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख रक्क्म  यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या