हॉस्टेलमध्येच 11 वीच्या विद्यार्थिनीची प्रसूती; पर्यवेक्षिका निलंबित

1805

छत्तीसगडच्या दंतेवाडमध्ये 11 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्येच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने मृत बालकाला जन्म दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून रुग्णालयात त्यांची धावाधाव सुरू झाली. या प्रकरणी हॉस्टेलच्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. हॉस्टेलच्या पर्यवेक्षिका हेमलता नाग यांना या घटनेबाबत माहिती होती. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दंतेवाडाच्या पताररसमध्ये 11 वीत शिकणाऱ्या17 वर्षांच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्येच बुधवारी मध्यरात्री प्रसूती झाली. तिने मृत बालकाला जन्म दिला. विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिला तिच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आले असून ते तिला डिमरामलला घेऊन गेल्याचे पर्यवेक्षिका नाग यांनी सांगितले. मात्र, घटना उघड झाल्यानंतर नाग यांनी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. ती विद्यार्थिनी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. खोटी माहिती दिल्याप्रकरणी आणि हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने नाग यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी पथकाची स्थापना केली आहे. उपजिल्हाधिकारी प्रीती दुर्गम यांच्या अध्यक्षेतखालील पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

विद्यार्थिनीचे गावातील एका मुलासोबत तिचे दोन वर्षांपासून संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर संबिधितांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रसूतीनंतर सकाळी विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या कटुंबियांना तिच्या प्रसूतीची माहिती मिळाल्यावर त्यांना धक्का बसला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीची भेट घेतली असून मुलीने त्यांना घटनेबाबतची माहिती दिली. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. याआधीही हॉस्टेलमध्ये अशा घटना घडल्या आहेत. मात्र, त्या दाबण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणात हॉस्टेल प्रशासनाच जाबाबदार असल्याचे सांगण्यात आले. हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींचे लैगिंक शोषण होत असल्याचे आरोपही होत आहेत. या प्रकरणातील विद्यार्थिनीने दिलेली माहिती धक्कादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून दोषींवर कठोर करवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुलीला तिच्या कटुंबीयासोबत पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या