
दापोलीची ग्रामदेवता श्री काळकाई देवीचा शिमगोत्सवातील मानाचा होम मंगळवारी पहाटे 5 वाजता लागला यावेळी अख्या दापोलीकरांनी केलेली गर्दी ही शिमगोत्सवातील उत्साहाचे खरे आकर्षण होते. होम लावण्या आधी भक्तगणांनी पालखीला खांदयावर घेवून मनोभावे नाचवले, कोणी वादयाच्या तालावर ताल धरून थिरकले तर केणी होळीच्या फाका मारत आपला आनंद व्दिगुणीत केला.
दापोली येथील श्री काळकाई देवी या ग्रामदेवतेला अनन्य साधारण एक महत्व आहे. दापोली शहराची रक्षणकर्ती असलेल्या श्री. काळकाई देवीचे मंदिर शहरातील विस्तर्ण अशा क्षेत्रात विस्तारलेले आहे. काळकाई कोंड, खोंडा (पाटीलवाडी), नागरबुडी व प्रभू आळीचा काहीसा भाग यात विभागलेला आहे. काळकाई ही जोगेळे गावाची ग्रामदेवता आणि कोंड म्हणजे पूर्वी मूळ गावापासून थोड्याा लांब अंतरावरील वस्तीला कोंड म्हणत असतं. त्या दापोलीतील काळकाई कोंडावर जोगेळे गावाचे काळकाई या नावाच्या ग्रामदेवतेचे अतिशय सुंदर असे देऊळ आहे. मंदिराची डागडुजी अनेक वेळा झाली असली तरी त्यात पारंपारिकतेच्या अजूनही खुणा आपले स्थान तसेच दर्शवित आहेत. मंदिराला भोवताली विस्तीर्ण अशी जागा लाभलेली आहे. ज्यामध्ये शेकडो वर्ष जुने मोठ मोठाले वृक्ष आहेत. मंदिरात काळकाईची काळया पाषाणातील सुबक अशी मूर्ती आहे. देवीच्या चार हातांपैकी फक्त एका हाती तलवार आहे. इतर हात निशस्त्र, रिकामे आहेत. काळकाईचा शिमगोत्सव व नवरात्रौत्सव देवळात खूप मोठयाप्रमाणात उत्सव साजरा करण्याची पूर्वापार येथील प्रथा परंपरा आहे. शिमगोत्सवात देवळाबाहेर निशाण उभारले जाते, गोंधळ घातला जातो आणि पालखीत ग्राम देवतांची मानाची रूपे बसवून काळकाई देवीची पालखी संपूर्ण जोगेळे गावात फिरवली जाते. काळकाईच्या पालखीत फक्त तीनच रूपे ठेवली जातात. ही तीन रूपे म्हणजेच आगरातील काळकाई, काळकाई कोंडावरील काळकाई आणि ताम्हणकरीन अशा तीन बहिणींना पालखीत स्थान आहे. शिमगोत्सवात काळकाई कोंडावरून पालखी निघाली की आगरातील काळकाई जवळ येते. तेथे मान दिल्यानंतर पालखी पुढे निघते. काळकाईच्या देवळात जे उत्सव, कार्यक्रम पार पडतात ते अगदी पूर्वापार एकोप्याने पार पडत आलेले आहेत. पूर्वीपासून येथे मान, विड्यााची प्रथा नाही. हजर असलेल्या प्रत्येकास येथे मान दिला जातो.
दापोलीतील मानाची आणि भक्तांच्या संकट काळात नवसाला सत्वर पावणारी देवी म्हणून या देवेतेची ख्याती आहे. त्यामुळे या देवतेला एक अनन्य साधारण असे महत्व आहे. अशा या देवतेचा शिमगोत्सवातील होम हा मंगळवारी पहाटे 5 वाजता वादयांच्या गजरात पेटविण्यात आला यावेळी दापोलीकरांच्या उत्साहाला आनंदाच्या उधानाचे भरते आले होते. होम लागेपर्यंत रात्रौभर नाच गाण्यांवर ताल थर अबालवृध्द स्त्री पुरूष आनंदाने नाचत होते. आणि पालखीचे भोई पालखीला खादयांवर घेवून आनंदाने पालखी नाचवत होते. त्यावेळी वाजणारे नगारे, ताशे, ढोल आणि फडकणारा भगवा निषान यांनी वातावरण चांगलेच प्रफुल्लीत झाले होते. जिकडे तिकडे आनंद आणि आनंदाचा जल्लोश आणि उत्साह सर्वांमध्ये संचारलेला पाहायला मिळत होता.