दापोलीत 18 हजार घरांचे तर मंडणगडात 8 हजार घरांचे नुकसान

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मंडणगड आणि दापोली तालुक्याला बसला आहे़. दापोलीत 18 हजार घरांचे मंडणगडमध्ये 8 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 6 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक नुकसान महावितरणचे झाले असून 900 हून अधिक खांब पडले आहेत. हा नुकसानीचा आकडा 20 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे. हा आकडा पुढील काळात वाढू शकतो अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.

पुढे ते म्हणाले की मी उद्यापासून दापोली आणि मंडणगड तालुक्यांच्या दौर्‍यावर जाणार आहे. तेथील नागरीकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच तेथील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार आहोत. दापोली तालुक्यात पाज, हर्णे, उटंबर, केळी, आडे, पाडले, आंजर्ले, मुरड, कर्दे, पंचनदी, दाभोळ, जुवेकर मोहल्ला, लाडघर, करजगाव, खोडतरे या गावांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मंडणगड तालुक्यातील कोझर, घाट, म्हाप्रळ, चिंचाळी, पन्हाळी, इस्लामपूर,कुंभार्ली, सावेली, पणदेरी, कोंडगाव, दहिवली, उंबरेत, मुरडी या गावांनाही आर्थिक फटका बसला आहे. मंडणगड आणि दापोलीमध्ये 1400हून अधिक झाडे पडली आहेत़. एकूण जिल्ह्यात 3200 झाडे पडली असून 27 हजार 872 घरांचे नुकसान झाले आहे़. 11 जनावरे मृत पावली आहेत़. अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर पडल्यामुळे काही गावे संपर्कहीन झाली असल्याची माहिती सामंत यांनी दिली़

कोवीड तपासणी लॅबचे उद्‌घाटन 9 जूनला

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील कोवीड तपासणी लॅबचे उद्‌घाटन 7 जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार होते़ पण लॅबचे साधनसामुग्री घेऊन येणारी गाडी आज रत्नागिरीत पोहोचली़. त्यामुळे हे उद्‌घाटन आता 7 जून ऐवजी 9 जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे अशी माहिती सामंत यांनी दिली़. नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरीकांना मोफत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी नगराध्यक्ष प्रदिप साळवी, उद्योजक किरण सामंत, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगरसेवक राजन शेट्ये, संतोष कीर, बाबा नागवेकर उपस्थित होते़.

आपली प्रतिक्रिया द्या